बीड : हवालदार कमलाकर मलवाड(पाटील) यांना राज्यस्तरीय 'सैनिक रत्न' पुरस्कार प्रदान
बीड, 27 जुलै (हिं.स.)। भारतीय सैन्यात प्रदीर्घ सेवा बजावल्यानंतर समाजसेवा, सहकार आणि माजी सैनिकांच्या कल्याणासाठी सातत्याने उल्लेखनीय कार्य करणारे गीत्ता (ता. अंबाजोगाई) येथील हवालदार कमलाकर ज्ञानोबा मलवाड (पाटील), व्हा. चेअरमन, त्रिदल माजी सैनिक स
सैनिक रत्न पुरस्कार


बीड, 27 जुलै (हिं.स.)। भारतीय सैन्यात प्रदीर्घ सेवा बजावल्यानंतर समाजसेवा, सहकार आणि माजी सैनिकांच्या कल्याणासाठी सातत्याने उल्लेखनीय कार्य करणारे गीत्ता (ता. अंबाजोगाई) येथील हवालदार कमलाकर ज्ञानोबा मलवाड (पाटील), व्हा. चेअरमन, त्रिदल माजी सैनिक सहकारी पतसंस्था मर्यादित, अंबाजोगाई तसेच तालुकाध्यक्ष, सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य यांना महाराष्ट्र राज्य सैनिक फेडरेशनतर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठेचा 'सैनिक रत्न' पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कारगिल विजय दिनानिमित्त नुकताच दादर, मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर येथे आयोजित राज्यस्तरीय समारंभात ब्रिगेडियर (नि.) सुधीर सावंत, माजी खासदार तथा अध्यक्ष, सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्रातील सामाजिक बांधिलकी जपत विविध लोकहितकारी उपक्रम राबविणाऱ्या माजी सैनिकांच्या कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार दिला जातो.

हवालदार कमलाकर ज्ञानोबा मलवाड (पाटील) यांनी १६ जानेवारी १९८० ते ३१ जानेवारी १९९६ या कालावधीत भारतीय सैन्याच्या आर्टिलरी विभागात तब्बल १६ वर्षे देशसेवा बजावली. सेवाकाळात राजस्थान, पंजाब तसेच सिक्कीम-चीन सीमेवरील संवेदनशील भागात कर्तव्य बजावताना त्यांनी देशरक्षणाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली. तसेच नागपूर, इलाहाबाद, दिल्ली आणि हैदराबाद येथील लष्करी तळांवर विविध महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या.

सेवानिवृत्तीनंतर १९९८ मध्ये त्यांनी आपल्या मूळ गाव गीत्ता येथे पोलीस पाटील म्हणून जबाबदारी स्वीकारली. सलग २५ वर्षे (२०२३ पर्यंत) कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय आणि जातीय भेदभावाला थारा न देता गावात शांतता, सलोखा व सामाजिक ऐक्य कायम राखण्यासाठी त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. अनेक गुंतागुंतीचे वाद सामोपचाराने मिटवून गावाच्या विकासात मोलाची भूमिका बजावली. सामाजिक व धार्मिक उपक्रमांमध्येही त्यांनी पुढाकार घेत गावासाठी आदर्श नेतृत्व उभे केले.

सहकार क्षेत्रातही त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी २००१ मध्ये स्थापन झालेल्या त्रिदल माजी सैनिक सहकारी पतसंस्था मर्यादित, अंबाजोगाईच्या स्थापनेत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. केवळ रु. १० हजारांच्या भांडवलावर सुरू झालेली ही संस्था आज कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणारी विश्वासार्ह संस्था बनली असून अनेक माजी सैनिक व सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक आधार देत आहे.

देशसेवा, समाजसेवा, सहकार क्षेत्रातील नेतृत्व, ग्रामविकास आणि माजी सैनिकांच्या हितासाठी केलेल्या बहुआयामी कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य सैनिक फेडरेशनने त्यांना 'सैनिक रत्न' पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांच्या या राज्यस्तरीय गौरवाबद्दल माजी सैनिक, सहकारी क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध स्तरांतील नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. हा सन्मान प्राप्त करणारे हवालदार कमलाकर ज्ञानोबा मलवाड (पाटील), बीड जिल्ह्यातील एकमेव माजी सैनिक असुन हा बीड जिल्ह्यासह अंबाजोगाई तालुका आणि गीत्ता गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande