
पुणे, 27 जुलै (हिं.स.)। अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करण्याचा निर्णय राष्ट्रीय जातनिहाय जनगणनेनंतरच अचूक लोकसंख्येच्या प्रमाणानुसार अमलात आणावा, या मागणीसाठी रिपब्लिकन पक्ष आठवले गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया नजीकच्या आंबेडकर पुतळ्यापासून भव्य महामोर्चा काढण्यात आल्या. पक्षाचे पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे ग्रामीण जिल्हयातील पदाधिकारी, कार्यकर्ते व ५९ जातींमधील नागरिक भर पावसात उत्साहाने या मोर्चात सहभागी झाले.
या मोर्चात पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पिंपरी चिंचवड अध्यक्ष कुणाल न्हावळकर, पुणे जिल्हा अध्यक्ष श्रीकांत कदम, महिला आघाडी अध्यक्ष चंद्रकांता सोनकांबळे यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. बौद्ध समाज आणि इतर अनुसूचित जाती जमाती मधील ऐक्य व्यक्त करणाऱ्या घोषणा या मोर्चात देण्यात आल्या. अनुसूचित जातींतील ५९ समाजघटकांमध्ये सामाजिक ऐक्य टिकवून ठेवणे ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)ची ठाम भूमिका आहे. उपवर्गीकरणाच्या प्रक्रियेमुळे कोणत्याही समाजघटकात मतभेद किंवा दुरावा निर्माण होऊ नये, यासाठी ती प्रक्रिया राष्ट्रीय जातीय जनगणना पूर्ण झाल्यानंतरच राबविण्यात यावी. जनगणनेतील लोकसंख्येच्या अचूक आकडेवारीच्या आधारेच न्याय्य निर्णय घेणे शक्य होणार आहे.
अनुसूचित जातींतील विविध समाजघटकांनी सामाजिक न्याय, समान हक्क आणि आरक्षणासाठी अनेक दशकांपासून एकत्रितपणे संघर्ष केला आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घाईघाईने घेण्याऐवजी वस्तुनिष्ठ माहितीच्या आधारे घेणे आवश्यक आहे. प्रत्येक जातीची अचूक लोकसंख्या जनगणनेतून समोर आल्यानंतरच उपवर्गीकरणाबाबत धोरण निश्चित केल्यास सर्व समाजघटकांना न्याय मिळू शकेल. राज्यातील उर्वरित ५८ अनुसूचित जातींनाही शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये समान संधी मिळाव्यात, ही पक्षाची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच २०२७ च्या जनगणनेनंतर लोकसंख्येच्या प्रमाणानुसार आरक्षणाच्या रचनेचाही पुनर्विचार करण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
अनुसूचित जाती मधील 59 समाज घटकांची अचूक लोकसंख्या माहीत नसताना उपवर्गीकरणाची अंमलबजावणी झाल्यास या समाज घटकांमध्ये रोष उत्पन्न होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनुसूचित जातींमधील ऐक्य आणि सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्यासाठी जनगणने नंतर लोकसंख्येच्या प्रमाणात उपवर्गीकरण करण्याची मागणी या मोर्चाद्वारे अधोरेखित करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु