
परभणी, 27 जुलै (हिं.स.)। यंदाचा श्याम देशपांडे स्मृती ग्रंथसखा पुरस्कार परभणी येथील डॉ.पवन चांडक यांना प्रदान केला जाणार आहे. वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी आयुष्यभर कार्यरत राहिलेल्या श्याम देशपांडे यांच्या स्मरणार्थ येथील 'संडे क्लब ' आणि देशपांडे परिवाराच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. ११ हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराचे वितरण रविवारी(दि. ९) ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. लीला शिंदे राहणार असून राज्य शासनाच्या ग्रंथालय विभागातील सेवानिवृत्त अधिकारी सतीश चिमणपुरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत.
डॉ. चांडक 'ग्रंथपेटी' चा उपक्रम राबवित शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड रुजविण्यासाठी कार्यरत आहेत. समाजातील संवेदनशील आणि दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने त्यांनी विविध शाळांना सुमारे १९० ग्रंथपेट्या उपलब्ध करून दिल्या आहेत. या पेट्यात वाचनीय आणि संस्कारक्षम अशा सुमारे २०० पुस्तकांचा समावेश असतो. गेल्या पाच वर्षांपासून हा उपक्रम ते राबवत आहेत. श्याम देशपांडे स्मृती ग्रंथसखा पुरस्काराचे हे पाचवे वर्ष आहे. या पूर्वी येथील मिर्झा अब्दुल कय्युम नदवी (छत्रपती संभाजीनगर), जीवन इंगळे (खटाव, जि. सातारा), मोहिनी कारंडे (पुणे), अभिजित जोंधळे (अंबाजोगाई) यांना हा पुरस्कार दिला गेला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis