जुनिपर ग्रीन एनर्जी आणि एमव्ही इलेक्ट्रोसिस्टिम्सचे आयपीओ ३० जुलैपासून होणार खुले
- प्राइस बँड आणि लॉट साइज जाहीर मुंबई, 27 जुलै (हिं.स.)। भांडवली बाजारात गुंतवणूकदारांसाठी ३० जुलैपासून आणखी दोन महत्त्वाचे आयपीओ खुले होणार आहेत. रिन्यूएबल एनर्जी क्षेत्रातील जुनिपर ग्रीन एनर्जी आणि रेल्वेसाठी इलेक्ट्रिकल व पॉवर इलेक्ट्रॉनिक्स उप
Juniper Green and MV Electrosystems Limited IPO to Open


Juniper Green and MV Electrosystems Limited IPO to Open


- प्राइस बँड आणि लॉट साइज जाहीर

मुंबई, 27 जुलै (हिं.स.)। भांडवली बाजारात गुंतवणूकदारांसाठी ३० जुलैपासून आणखी दोन महत्त्वाचे आयपीओ खुले होणार आहेत. रिन्यूएबल एनर्जी क्षेत्रातील जुनिपर ग्रीन एनर्जी आणि रेल्वेसाठी इलेक्ट्रिकल व पॉवर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे तयार करणारी एमव्ही इलेक्ट्रोसिस्टिम्स लिमिटेड या दोन्ही कंपन्यांनी त्यांच्या आयपीओसाठी प्राइस बँड, लॉट साइज आणि इश्यूचा तपशील जाहीर केला आहे. दोन्ही कंपन्यांचे इश्यू ३० जुलैपासून सबस्क्रिप्शनसाठी खुले होतील आणि ३ ऑगस्टपर्यंत गुंतवणूकदारांना अर्ज करता येणार आहे. दोन्ही कंपन्यांचे शेअर्स ६ ऑगस्ट रोजी बीएसई आणि एनएसईवर सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे.

जुनिपर ग्रीन एनर्जीने आपल्या आयपीओसाठी प्रति शेअर २१४ ते २२५ रुपये असा प्राइस बँड निश्चित केला असून एका लॉटमध्ये ६६ शेअर्स असतील. किरकोळ गुंतवणूकदारांना किमान एका लॉटसाठी १४,८५० रुपयांची गुंतवणूक करावी लागेल, तर कमाल १३ लॉटसाठी १,९३,०५० रुपयांपर्यंत अर्ज करता येणार आहे. या इश्यूद्वारे कंपनी १,८०० कोटी रुपये उभारणार असून १० रुपये दर्शनी मूल्याचे आठ कोटी नवीन शेअर्स जारी केले जाणार आहेत. इश्यूमध्ये क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्ससाठी ५० टक्के, रिटेल गुंतवणूकदारांसाठी किमान ३५ टक्के आणि नॉन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्ससाठी किमान १५ टक्के हिस्सा राखीव ठेवण्यात आला आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीज ही बुक रनिंग लीड मॅनेजर असून केफिन टेक्नॉलॉजीज ही रजिस्ट्रार म्हणून काम पाहणार आहे.

कंपनीच्या आर्थिक कामगिरीकडे पाहिल्यास महसुलात सातत्याने वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ४२४.४५ कोटी रुपयांचा महसूल असलेली कंपनी २०२५-२६ मध्ये ८०४.९३ कोटी रुपयांच्या महसुलापर्यंत पोहोचली आहे. ईबीटीडीएमध्येही ३७०.८४ कोटी रुपयांवरून ६९२.१८ कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. मात्र, याच काळात कंपनीवरील कर्जात मोठी वाढ होऊन ते २,६७१.७० कोटी रुपयांवरून १२,९२०.५४ कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. निव्वळ नफा २०२५-२६ मध्ये ४०.४६ कोटी रुपये इतका नोंदविण्यात आला असून राखीव निधी आणि सरप्लसमध्येही वाढ झाली आहे.

दुसरीकडे, हरियाणास्थित एमव्ही इलेक्ट्रोसिस्टिम्स लिमिटेडने आपल्या आयपीओसाठी प्रति शेअर ४०० ते ४२५ रुपये असा प्राइस बँड जाहीर केला आहे. ५ रुपये दर्शनी मूल्याच्या या इश्यूमध्ये किमान ३४ शेअर्ससाठी आणि त्यानंतर ३४ शेअर्सच्या पटीत अर्ज करता येणार आहे. हा २,९०० दशलक्ष रुपयांचा पूर्णपणे फ्रेश इश्यू असून यात केवळ नवीन शेअर्स जारी केले जाणार आहेत. अँकर गुंतवणूकदारांसाठी २९ जुलै रोजी बोली प्रक्रिया खुली राहणार आहे.

एमव्ही इलेक्ट्रोसिस्टिम्स आयपीओतून मिळणाऱ्या निधीपैकी १,८०० दशलक्ष रुपये दीर्घकालीन वर्किंग कॅपिटलसाठी, २१० दशलक्ष रुपये नवीन पॉवर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांच्या रिसर्च, डिझाईन आणि डेव्हलपमेंटसाठी खर्च केले जाणार असून उर्वरित निधी सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी वापरण्यात येणार आहे. कंपनी रेल्वे रोलिंग स्टॉकमध्ये वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिकल आणि पॉवर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचे डिझाईन, डेव्हलपमेंट, असेंब्ली आणि मॅन्युफॅक्चरिंग करणारी तंत्रज्ञानाधारित कंपनी म्हणून ओळखली जाते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande