सलग पाच दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजार जोरदार तेजीत झाला बंद
- गुंतवणूकदारांना ५.२० लाख कोटी रुपयांचा फायदा नवी दिल्ली, 27 जुलै (हिं.स.)। सलग पाच व्यवहार सत्रांपासून सुरू असलेल्या घसरणीला अखेर ब्रेक लागला असून भारतीय शेअर बाजारात सोमवारी जोरदार तेजी पाहायला मिळाली. पश्चिम आशियात अमेरिका आणि इराण यांच्यात सु
Stock Market Closing


- गुंतवणूकदारांना ५.२० लाख कोटी रुपयांचा फायदा

नवी दिल्ली, 27 जुलै (हिं.स.)। सलग पाच व्यवहार सत्रांपासून सुरू असलेल्या घसरणीला अखेर ब्रेक लागला असून भारतीय शेअर बाजारात सोमवारी जोरदार तेजी पाहायला मिळाली. पश्चिम आशियात अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या हल्ल्यांची तीव्रता कमी झाल्याने जागतिक बाजारातील तणाव कमी झाला आणि त्याचा सकारात्मक परिणाम भारतीय बाजारावरही दिसून आला. दिवसभर झालेल्या मजबूत खरेदीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी मोठी झेप घेत व्यवहाराची सांगता केली. या तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत एका दिवसात सुमारे ५.२० लाख कोटी रुपयांची भर पडली.

व्यवहाराच्या सुरुवातीलाच बाजाराने मजबूत सुरुवात केली. सकाळच्या सत्रात काही प्रमाणात चढ-उतार दिसून आले, मात्र अकराच्या सुमारास खरेदीचा जोर वाढल्याने बाजाराने वेग घेतला. बीएसईचा सेन्सेक्स ५४९.२१ अंकांच्या वाढीसह ७६,६०८.९८ अंकांवर उघडला. त्यानंतर दिवसभरात तो ७६,९०१.५१ अंकांच्या उच्चांकापर्यंत पोहोचला. शेवटच्या टप्प्यात काही प्रमाणात नफा वसुली झाली असली तरी सेन्सेक्स ७७६.०१ अंकांच्या वाढीसह ७६,८३५.७८ अंकांवर बंद झाला. एनएसईचा निफ्टीही मजबूत सुरुवात करत २३,९२८.४० अंकांवर उघडला. सुरुवातीच्या व्यवहारात किरकोळ चढ-उतार झाल्यानंतर दुपारच्या सत्रात खरेदीचा वेग वाढला. निफ्टीने २४,०११.६० अंकांचा उच्चांक गाठला आणि अखेरीस २२८.५० अंकांच्या वाढीसह २३,९९५.९५ अंकांवर व्यवहार संपवला.

क्षेत्रनिहाय पाहता मिडिया क्षेत्रातील समभागांनी सर्वाधिक चमक दाखवली. याशिवाय आयटी, रिअल्टी, ऑटोमोबाईल आणि फार्मास्युटिकल क्षेत्रातील समभागांमध्येही मोठ्या प्रमाणावर खरेदी झाली. एफएमसीजी, बँकिंग, इन्फ्रास्ट्रक्चर, मेटल, कन्झ्युमर ड्युरेबल्स, कॅपिटल गुड्स आणि पब्लिक सेक्टर एंटरप्रायझेस या क्षेत्रांतील निर्देशांकही वाढीसह बंद झाले. मात्र ऑईल अँड गॅस क्षेत्रातील समभागांवर विक्रीचा दबाव कायम राहिला.

ब्रॉडर मार्केटमध्येही सकारात्मक वातावरण होते. मिडकॅप निर्देशांक १.११ टक्क्यांनी, तर स्मॉलकॅप निर्देशांक १.३१ टक्क्यांनी वाढून बंद झाला. बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण मार्केट कॅपिटलायझेशन वाढून ४८०.८२ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. मागील व्यवहार सत्रात ते ४७५.६२ लाख कोटी रुपये होते. त्यामुळे एका दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे ५.२० लाख कोटी रुपयांची वाढ झाली.

दिवसभरात बीएसईवर ४,५५८ समभागांमध्ये व्यवहार झाले. त्यापैकी २,७७९ समभाग वाढीसह, १,५७९ समभाग घसरणीसह, तर २०० समभाग स्थिर राहिले. एनएसईवर ३,०१५ समभागांमध्ये व्यवहार झाले. यापैकी २,०५८ समभाग वाढले, तर ९५७ समभाग घसरले. सेन्सेक्समधील ३० पैकी २८ समभाग वाढीसह बंद झाले, तर निफ्टीतील ५० पैकी ४४ समभागांनी तेजी नोंदवली. एटर्नल, इंटर ग्लोब एव्हिएशन, इन्फोसिस, बजाज फायनान्स आणि श्रीराम फायनान्स हे सर्वाधिक वाढणारे समभाग ठरले. तर ओएनजीसी, एचडीएफसी बँक, एचडीएफसी लाईफ, सिप्ला आणि डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज या समभागांमध्ये घसरण नोंदवली गेली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande