
नवी दिल्ली, 27 जुलै (हिं.स.) - कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याने देशभरात वेगळेच वातावरण निर्माण झाले आहे. त्याचे पडसाद लोकसभा आणि राज्यसभेच्या कामकाजावर पडल्याचे दिसून येत आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातही कामकाज सुरळीत सुरू झालेले नाही. या पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दोन्ही बाजूंच्या सदस्यांना समजावून सांगताना सरकार आणि विरोधक यांनी आपापसात चर्चा करून सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकमत घडवून आणावे, जेणेकरून त्यानंतर शांततेत सविस्तर चर्चा सुरू करता येईल, असा सुवर्णमध्य सुचवला होता. या महत्त्वाच्या विधेयकावर एकूण ९१ विविध दुरुस्त्या सादर करण्यात आल्या आहेत, ज्यावरून या विधेयकाचे गांभीर्य लक्षात येते. देशातील स्पर्धा परीक्षांच्या संपूर्ण व्यवस्थेत पारदर्शकता आणि सुधारणा घडवून आणण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी आपसातील मतभेद विसरून एकत्र येणे काळाची गरज असल्याचे सांगत अध्यक्षांनी या विधेयकावर सविस्तर चर्चेसाठी ६ तासांचा समर्पित अवधी देण्याची घोषणा केली होती.
विरोधी पक्षाच्या नेत्यांना चर्चेत सकारात्मक सहभाग घेण्याचे आवाहन
संसदेत सुरू असलेल्या या अभूतपूर्व गोंधळावर तीव्र नाराजी व्यक्त करताना केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना चर्चेत सकारात्मक सहभाग घेण्याचे आवाहन केले. विरोधकांची मागणी असल्यास चर्चेचा वेळ आणखी वाढवून दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. रिजिजू म्हणाले, संसदेतील सर्व सदस्य या महत्त्वपूर्ण विषयावरील चर्चेसाठी पूर्ण तयारीने आणि अभ्यास करून आले आहेत. अनेक विरोधी सदस्यांनी आपल्या आवश्यक त्या दुरुस्त्या देखील आधीच सादर केल्या आहेत. हे विधेयक देशातील विद्यार्थी आणि युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मात्र, दुर्दैवाने काँग्रेस आणि त्यांचे काही सहकारी पक्ष जाणीवपूर्वक आणि राजकीय हेतूने या विधेयकावर सभागृहात चर्चा होऊ देत नाहीत. सभापतींनी यापूर्वीच या विषयासाठी ६ तासांचा विशेष वेळ राखून ठेवला असून, विरोधी पक्षांना अजून वेळ हवा असल्यास तोही सढळ हाताने दिला जाईल, असे सांगत विरोधकांनी संसदेत असे विनाकारण गदारोळ करण्याचे प्रकार टाळावेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी