
हरारे, 27 जुलै (हिं.स.)भारताचे हंगामी मुख्य प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा विश्वास आहे की, युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने आपली पूर्ण क्षमता गाठण्यासाठी आणि आपला खेळ पुढील स्तरावर नेण्यासाठी फिटनेसमध्ये सतत सुधारणा केली पाहिजे. हरारे येथे झिम्बाब्वेविरुद्धच्या अखेरच्या टी-20 सामन्यात भारताच्या ३५ धावांच्या विजयात सूर्यवंशीने ४९ चेंडूंमध्ये शानदार ८१ धावा केल्या. त्याच्या सामना जिंकवून देणाऱ्या खेळीमुळे तो तीन सामन्यांमध्ये १५१ धावांसह मालिकेतील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आणि वैभवला आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिला 'मालिकावीर' पुरस्कार मिळाला. सूर्यवंशी फक्त १५ वर्षांचा आहे आणि त्याने इतक्या लहान वयातच आपल्या फलंदाजीतील कौशल्य सिद्ध केले आहे. त्याला भारतीय क्रिकेटचे भविष्य मानले जाते.
आतापर्यंत सूर्यवंशीच्या फलंदाजीने क्रिकेट जग प्रभावित झाले असले तरी, लक्ष्मण यांनी एका गोष्टीकडे लक्ष वेधले आहे, ज्यावर या युवा क्रिकेटपटूला आपली प्रगती सुरू ठेवायची असेल तर काम करण्याची गरज आहे.
लक्ष्मण म्हणतात की, त्याच्यात एक गोष्ट सुधारणा व्हावी अशी आमची इच्छा आहे, ती म्हणजे त्याची सर्वांगीण तंदुरुस्ती. त्यांनी पुढे सांगितले की, सूर्यवंशी खूप तरुण आहे. त्याला खेळाच्या प्रत्येक पैलूमध्ये सुधारणा करायची आहे. आजही, जेव्हा तो जखमी झाला (डीप स्क्वेअर लेगवरून धावत येऊन झेप घेऊन झेल घेण्याचा प्रयत्न करताना), तेव्हाही त्याला मैदानावरच राहायचे होते. फिजिओने त्याला बाहेर यायला सांगितले. संघासाठी शक्य त्या प्रत्येक मार्गाने योगदान देण्याचा तोच उत्साह आणि आवड त्याच्यात आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला भारताच्या यशस्वी अंडर-१९ विश्वचषक मोहिमेचे नेतृत्व करणाऱ्या लक्ष्मण यांनी सूर्यवंशीच्या यशाच्या झपाट्याने होणाऱ्या वाटचालीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या तरुण प्रतिभेने फलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी केली, ४३९ धावांसह स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा क्रिकेटपटू ठरला आणि 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट'चा पुरस्कारही जिंकला. त्याने आयपीएलच्या गेल्या दोन हंगामात राजस्थान रॉयल्ससाठीही उत्कृष्ट कामगिरी केली. तो आयपीएल २०२६ मध्ये सर्वाधिक धावा करणारा क्रिकेटपटू होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे