
बारामुल्ला, 28 जुलै (हिं.स.) : जम्मू-कश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) झालेल्या माइन स्फोटात भारतीय लष्कराचे दोन जवान जखमी झाले आहेत. हा स्फोट कमलकोट सब-सेक्टरमधील 12 इन्फंट्री ब्रिगेडच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या 8 राष्ट्रीय रायफल्सच्या ‘अपर गढ़ फॉरवर्ड पोस्ट’जवळ झाला. हे क्षेत्र उरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते.
स्फोटानंतर जखमी जवानांना तातडीने घटनास्थळावरून बाहेर काढण्यात आले आणि एअर ऍम्ब्युलन्सच्या माध्यमातून श्रीनगर येथील बादामीबागमधील लष्करी बेस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दफादार विजय कुमार (वय 42 वर्षे) आणि नायक शरणपा अंगारी (वय 28 वर्षे) अशी जखमी जवानांची नावे आहेत. दोघेही 8 राष्ट्रीय रायफल्समध्ये तैनात आहेत. माइन स्फोट नेमका कशामुळे झाला, याचा तपास लष्करी अधिकाऱ्यांकडून सुरू आहे.दरम्यान, हा स्फोट जम्मूमध्ये स्वातंत्र्यदिनाच्या (15 ऑगस्ट) कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीच्या वेळी झाला आहे. या बैठकीचे अध्यक्षस्थान जम्मूचे विभागीय आयुक्त रमेश कुमार यांनी भूषवले, तर पोलीस महानिरीक्षक (आयजीपी) भीम सेन तुती यांनी सह-अध्यक्ष म्हणून सहभाग घेतला. बैठकीला विविध विभाग आणि जिल्ह्यांतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यापूर्वी सांबा आणि राजौरी जिल्ह्यांतील आंतरराष्ट्रीय सीमा तसेच नियंत्रण रेषेजवळ संशयास्पद पाकिस्तानी ड्रोन दिसल्यानंतर सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरू केली होती. सुरक्षा दलांनी सांबा येथील नंदपूर परिसर आणि राजौरीच्या नौशेरा सेक्टरमधील तारकुंडी-साज भागात ड्रोनच्या संशयास्पद हालचाली नोंदवल्या. लष्कराने पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणांच्या मदतीने संयुक्त शोध मोहीम राबवली. या कारवाईचा उद्देश संशयास्पद ड्रोनच्या माध्यमातून कोणतेही शस्त्रास्त्र किंवा अमली पदार्थ टाकण्यात आले आहेत का, याचा शोध घेणे हा आहे.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी