
सोलापूर, 28 जुलै (हिं.स.) : उजनी धरणातून भीमा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदी दुथडी भरून वाहत आहे. मात्र, नदीकाठच्या शेतीसाठी आवश्यक असलेला नियमित वीजपुरवठा मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. आठ तास वीज द्यायची असेल तरच नदीत पाणी सोडा, अन्यथा पाणी सोडू नका, अशा भावना संतप्त शेतकऱ्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, उजनी धरणात पाणी उपलब्ध असूनही मागील उन्हाळ्यात वेळेवर नदीत पाणी न सोडल्यामुळे नदीकाठच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी प्रशासनाकडे पाणी सोडण्याची मागणी केली होती. मात्र, उशिराने पाणी सोडण्यात आले आणि त्याचवेळी वीजपुरवठा खंडित झाल्याने शेतीला अपेक्षित लाभ मिळू शकला नाही.
यंदा मंगळवेढा तालुक्यात समाधानकारक पाऊस झालेला नसला, तरी उजनी आणि वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरण पूर्ण क्षमतेकडे वाटचाल करत आहे. परिणामी भीमा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. मात्र, पावसाळ्यात बंधाऱ्यांचे दरवाजे उघडे असल्याने विसर्ग थांबताच नदीपात्र पुन्हा कोरडे पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीतील पाण्याचा शेतीसाठी प्रभावी उपयोग होण्यासाठी दररोज किमान आठ तास नियमित वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
या संदर्भात आमदार समाधान आवताडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे, तर खासदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे नदीकाठच्या शेतीसाठी नियमित वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे. मात्र, प्रशासनाकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नसल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.
दरम्यान, भीमा नदीत पुन्हा २५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने नदीपात्र भरून वाहत आहे. मात्र, वीजपुरवठ्याअभावी हे पाणी शेतातील पिकांपर्यंत पोहोचत नसल्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांना वाहून जाणारे पाणी हताशपणे पाहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने नियमित वीजपुरवठा सुरू करून नदीतील पाण्याचा शेतीसाठी प्रभावी वापर होईल, यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड