
मुंबई , 31 जुलै (हिं.स.)।भारताचा दिग्गज वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने फिटनेस चाचणी यशस्वीरीत्या पास केली आहे. भारतीय संघ आणि चाहत्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. बुमराह संघात असला की प्रतिस्पर्धी संघावर नेहमीच अतिरिक्त दबाव निर्माण होतो. त्यामुळे फिटनेस चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतर तो कोणत्या मालिकेत भारतीय संघाकडून खेळताना दिसणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जसप्रीत बुमराहने फिटनेस टेस्ट यशस्वीरीत्या पार केली आहे. नुकत्याच झालेल्या इंग्लंड दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान त्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याने लॉर्ड्स येथे खेळवण्यात आलेला मालिकेतील अखेरचा वनडे सामना गमावला होता. त्यानंतर तो पुनर्वसनासाठी (रिहॅब) बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये दाखल झाला होता. आता त्याला बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्सकडून फिटनेस प्रमाणपत्र मिळाले आहे.
भारतीय संघ 15 ऑगस्टपासून श्रीलंका दौऱ्यावर दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी 28 जुलै रोजी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली होती. या संघात जसप्रीत बुमराहचाही समावेश करण्यात आला होता. मात्र, बीसीसीआयने त्याचा सहभाग फिटनेसवर अवलंबून असल्याचे स्पष्ट केले होते.
आता बुमराहने फिटनेस चाचणी उत्तीर्ण केल्याने तो श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळताना दिसणार आहे. बुमराहने आपला शेवटचा कसोटी सामना नोव्हेंबर 2025 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. जवळपास वर्षभरानंतर तो पुन्हा कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. या मालिकेत त्याची कामगिरी कशी राहते, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष असेल.
श्रीलंका कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ : शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत, साई सुदर्शन, ध्रुव जुरेल, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर बरार, देवदत्त पडिक्कल आणि सारांश जैन.
भारत-श्रीलंका कसोटी मालिकेचे वेळापत्रक: पहिली कसोटी: 15 ते 19 ऑगस्ट 2026 स्थळ : गाले आंतरराष्ट्रीय स्टेडियम, गाले आणि दुसरी कसोटी: 23 ते 27 ऑगस्ट 2026 स्थळ : सिंहलीज स्पोर्ट्स क्लब, कोलंबो
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode