
नवी दिल्ली, 31 जुलै (हिं.स.) - दिल्लीत फेब्रुवारी २०२० मध्ये झालेल्या दंगलीवेळी आयबी अधिकारी अंकित शर्मा यांच्या हत्येप्रकरणी आज दिल्लीतील कडकडडूमा न्यायालयाने निकाल सुनावला आहे. न्यायालयाने आम आदमी पार्टीचा माजी नगरसेवक ताहिर हुसेनसह पाच दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी १३ जुलै रोजी कडकडडूमा न्यायालयाने माजी नगरसेवक ताहिर हुसेन, नाजिम, कासिम, जावेद आणि अनस यांना हत्या, अपहरण, दंगल आणि जातीय द्वेष पसरवल्याबद्दल दोषी ठरवले होते. तर, 11 आरोपींपैकी 6 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. त्यानंतर आज, शुक्रवारी या सर्व आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रवीण सिंह यांनी शिक्षेचा निर्णय देताना हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून त्याने संपूर्ण समाज हादरला, असे नमूद केले. या घटनेने संपूर्ण समाजाला विचार करायला भाग पाडले आहे. दरम्यान, शिक्षेच्या सुनावणीपूर्वी दिल्ली पोलिसांच्या वतीने विशेष सरकारी वकील मधुकर पांडे यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना अंकित शर्मा यांची अत्यंत निर्दयीपणे हत्या करण्यात आली असून दोषींनी कोणतीही दया दाखवली नव्हती, त्यामुळे त्यांच्याबाबतही कोणतीही सहानुभूती दाखवू नये, अशी भूमिका मांडली. मात्र न्यायालयाने निकाल देताना सर्व दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ताहिर हुसैनच्या वकिलांनी युक्तिवाद केला होता की, प्रत्येक खुनाच्या प्रकरणात फाशीची शिक्षा दिली जाऊ शकत नाही. कोणत्याही दोषीची वेगवेगळी भूमिका स्पष्टपणे सांगितली नाही. त्यामुळे हे प्रकरण 'रेअरेस्ट ऑफ रेअर' श्रेणीत येत नाही.
न्यायालयाने ताहीर हुसेन याला भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ (शासकीय आदेशाचे उल्लंघन), १५३अ (समाजात तेढ निर्माण करणे), १४७ (दंगल), १४८ (घातक शस्त्रासह दंगल), १४९ (बेकायदेशीर जमाव), ३६५ (अपहरण करून बेकायदेशीरपणे डांबून ठेवण्याचा हेतू) आणि ३०२ (हत्या) अंतर्गत दोषी ठरवले. याच प्रकरणात नाझिर, असीम, जावेद आणि अनस यांनाही याच कलमांखाली दोषी ठरवण्यात आले.
या प्रकरणातील एफआयआर २६ फेब्रुवारी २०२० रोजी अंकित शर्मा यांचे वडील रवींद्र कुमार यांच्या तक्रारीवरून नोंदवण्यात आला होता. तक्रारीनुसार, नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (CAA) समर्थनार्थ आणि विरोधातील आंदोलनादरम्यान चांदबाग परिसरात दगडफेक, जाळपोळ, गोळीबार आणि हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या.
फेब्रुवारी २०२० मध्ये उत्तर-पूर्व दिल्लीमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याचे (सीएए) विरोधक आणि समर्थक आमने सामने आले होते. त्यानंतर दोन्ही बाजूंनी दगडफेक सुरू झाली होती. त्यामुळे झालेल्या दंगली दरम्यान, आयबी अधिकारी अंकित शर्मा यांची हत्या झाली होती. नंतर अंकित शर्मा यांचा मृतदेह एका नाल्यामध्ये सापडला होता. या प्रकरणी दीर्घकाळ चाललेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने सर्व आरोपींना दोषी ठरवले आणि आज त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. २६ फेब्रुवारीपर्यंत चाललेल्या दंगलीत ५३ लोकांचा बळी गेला होता. २५० हून अधिक लोक जखमी झाले होते. मरण पावलेल्यांमध्ये ३८ मुस्लिम आणि १५ हिंदू होते. सुमारे ८०० दुकाने जाळण्यात आली होती. ५०० हून अधिक घरांना आग लावण्यात आली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी