
बगदाद , 31 जुलै (हिं.स.)।इराण समर्थित लढवय्यांवर अमेरिकेने आणि सौदी अरेबियाने संयुक्तपणे केलेल्या लष्करी हल्ल्यांबाबत इराकने मोठे वक्तव्य केले आहे. इराक सरकारने स्पष्ट केले आहे की, या हल्ल्यांना त्यांनी कोणतीही परवानगी दिलेली नव्हती आणि त्याबाबत त्यांना पूर्वकल्पनाही नव्हती. या हल्ल्यांमध्ये इराण समर्थित पॉप्युलर मोबिलायझेशन फोर्सेस या संघटनेच्या किमान 20 लढवय्यांचा मृत्यू झाला आहे.
वृत्तानुसार, या घटनेनंतर इराकचे पंतप्रधान मोहम्मद शिया अल-सुदानी यांनी आपला प्रस्तावित सौदी अरेबिया दौरा सध्या स्थगित केला आहे. इराक सरकारचे प्रवक्ते हैदर अल-अबूदी यांनी सांगितले की, “इराक सरकारने आपल्या हद्दीतील कोणत्याही ठिकाणावर किंवा गटावर हल्ला करण्यास परवानगी दिलेली नाही. तसेच या कारवाईची कोणतीही पूर्वमाहिती सरकारला नव्हती.” हे वक्तव्य अशा वेळी समोर आले आहे, जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा लष्करी हल्ला इराकी नेतृत्वाच्या समन्वयाने करण्यात आल्याचा दावा केला होता. मात्र, इराकने ट्रम्प यांचा हा दावा स्पष्टपणे फेटाळून लावला आहे. यापूर्वी बुधवारीही इराकने या हल्ल्यांचा अधिकृत निषेध नोंदवला होता.
दरम्यान, इराकने सौदी अरेबियाकडे अशा आरोपांबाबत पुरावे मागितले आहेत की, इराकमधील इराण समर्थित सशस्त्र गटांनी सौदी अरेबियावर ड्रोन हल्ले केले होते. सौदी अरेबियाच्या संरक्षण मंत्रालयाचा दावा आहे की, सोमवारी आणि मंगळवारी इराकच्या भूमीवरून उड्डाण केलेल्या ड्रोनद्वारे राजधानी रियाध तसेच महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आले होते. मात्र, इराकी पंतप्रधानांचे प्रवक्ते सबाह अल-नुमान यांनी सांगितले की, या आरोपांच्या समर्थनार्थ अद्याप कोणत्याही पक्षाने कोणतेही ठोस पुरावे सादर केलेले नाहीत.
अल-नुमान यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, इराक आपल्या भूमीचा वापर कोणत्याही बिगर-सरकारी किंवा सशस्त्र गटांकडून इतर देशांवर हल्ला करण्यासाठी होऊ देणार नाही. त्याचबरोबर त्यांनी इराकच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन करणारी कोणतीही परकीय लष्करी कारवाईही स्वीकारली जाणार नसल्याचे सांगितले. ते म्हणाले, “इराक सरकार देशाच्या हद्दीतून होणारी कोणतीही एकतर्फी कारवाई सहन करणार नाही. तसेच देशाच्या सीमांबाहेरून होणारे कोणतेही सार्वभौमत्वभंगही मान्य केले जाणार नाहीत.” अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण मध्य पूर्वेत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode