
टोकियो , 31 जुलै (हिं.स.)।कुमामोटो प्रांत प्रशासनाने शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण-पश्चिम जपानमध्ये झालेल्या शक्तिशाली भूकंपातील मृतांचा आकडा ३४ वर पोहोचला आहे. या भूकंपामुळे एका मॉलमध्ये स्फोट झाला, एका कारखान्याची धुराडी कोसळली आणि अनेक घरे उद्ध्वस्त झाली.
मंगळवारी जपानच्या दक्षिणेकडील मुख्य बेट क्यूशूमध्ये रिश्टर स्केलवर ७.१ तीव्रतेचा भूकंप झाला होता. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या आपत्तीशी संबंधित ३४ मृत्यूंची पुष्टी झाली असून आणखी एका मृत्यूची चौकशी सुरू आहे. गुरुवारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, ८० हून अधिक जण जखमी झाले असून त्यापैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे.
दरम्यान, ३,५०० हून अधिक घरांमध्ये अजूनही वीजपुरवठा खंडित होता. ९,००० हून अधिक लोक निवारा केंद्रांमध्ये राहत असून, तेथे वातानुकूलनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अतिरिक्त वीजस्रोत जोडले जात आहेत. भूकंपानंतर प्रचंड उष्णतेमुळे तसेच इतर आरोग्यविषयक समस्यांबाबत चिंता वाढली आहे. शुक्रवारी कुमामोटो परिसरात बचावकार्य सुरूच होते. यामध्ये काशिमा शहरातील कोसळलेल्या एयॉन मॉल शॉपिंग सेंटरच्या परिसराचाही समावेश होता, जिथे सर्वाधिक नुकसान झाले आहे. भूकंपाच्या वेळी या संकुलात हजारो लोक उपस्थित होते.
कंपनीने सांगितले की, मॉलच्या दुसऱ्या भागात स्फोट होण्यापूर्वी सुमारे ३,००० ग्राहकांना पार्किंग परिसरात सुरक्षितपणे हलविण्यात आले होते. स्फोटाच्या वेळी मॉलमधील काही कर्मचारी आपले काम करत होते. स्फोटानंतर मॉलचा दुसरा मजला कोसळला, ज्यामुळे अनेक लोक आत अडकले.
जपानचे मुख्य कॅबिनेट सचिव मिनोरू किहारा यांनी टोकियो येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, घटनास्थळी सात जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली असून ११ जणांची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे. मात्र, अद्याप किती जण बेपत्ता आहेत याबाबत अधिकाऱ्यांनी माहिती दिलेली नाही.
दरम्यान, किहारा यांनी सांगितले की, यात्सुशिरो भागातील निप्पॉन पेपर इंडस्ट्रीजच्या कारखान्यात भूकंपादरम्यान धुराडी कोसळल्यानंतर सुरू असलेले शोध व बचाव अभियान आता संपविण्यात आले आहे. बचाव पथकांनी तेथून ११ जणांना सुरक्षित बाहेर काढले असून, नऊ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode