
नवी दिल्ली, 31 जुलै (हिं.स.)। राम मंदिरातील कथित देणगी चोरीच्या निषेधार्थ शुक्रवारी संसद परिसरात विरोधी पक्षाच्या खासदारांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. या आंदोलनात खासदार पप्पू यादव पुजाऱ्याच्या वेशात सहभागी झाले होते. त्यांनी प्रतीकात्मक स्वरूपात एक दानपेटी आणली होती. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षातील अनेक खासदारांनी या दानपेटीत देणगी जमा केली. त्यानंतर पप्पू यादव यांनी प्रतीकात्मक निषेध म्हणून दानपेटी घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपस्थित खासदारांनी त्यांना पकडले.
या आंदोलनादरम्यान खासदारांनी विविध फलक हातात घेतले होते. त्यापैकी एका फलकावर ‘अमित शाह संसदेतून का गायब?’ असा सवाल करण्यात आला होता. विरोधकांनी या माध्यमातून सरकारवर टीका करत आपला निषेध व्यक्त केला.
दरम्यान, शुक्रवारी लोकसभेचे कामकाज सकाळी 11 वाजता सुरू झाले. मात्र, विरोधी पक्षांच्या घोषणाबाजी आणि गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. त्यानंतर दुपारी 12 वाजता कामकाज पुन्हा सुरू झाले. केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत जन्म आणि मृत्यू नोंदणी (सुधारणा) विधेयक, 2026 मंजूर करण्याचा प्रस्ताव मांडला. हे विधेयक आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले.
विधेयक मंजूर झाल्यानंतरही विरोधी पक्षांचा गदारोळ कायम राहिल्याने लोकसभेचे कामकाज 3 ऑगस्टपर्यंत तहकूब करण्यात आले. लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचे कामकाज पुढील तारखेपर्यंत स्थगित करण्यात आले आहे.
यावेळी संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधकांना सभागृहात चर्चेत सहभागी होण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, भविष्यात अशा प्रकारच्या परिस्थिती टाळण्यासाठी सर्वांनी चर्चेत सहभागी झाले पाहिजे. सभागृहात गोंधळ घालून नंतर सरकार चर्चा करू देत नसल्याचा आरोप करू नये, असे त्यांनी सांगितले. पुढील विधेयकांवरही चर्चा व्हावी, गोंधळ नको, अशी भूमिका त्यांनी मांडली.
दरम्यान, काँग्रेसने केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या संसदेतील वक्तव्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडला आहे. जंतर मंतर आणि संसद मोर्चादरम्यान आंदोलकांवर गोळीबार झाला नसल्याचे जितेंद्र सिंह यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत काँग्रेसने हक्कभंगाची मागणी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule