मुंबई-पुण्यासह राज्यात पावसाने दाणादाण : पूरस्थिती, दरडी कोसळल्याने रस्ते-रेल्वे सेवा प्रभावित
- आवश्यकता असल्यास घराबाहेर पडावं, ''वर्क फ्रॉम होम''चा अवलंब करण्याचे आवाहन- उद्याही अलर्ट, नाशिकवर ढगफुटीचं संकट, उद्या त्र्यंबकेश्वर, सप्तश्रृंगी मंदिर भाविकांसाठी बंद- कोकण-मुंबईसाठी 48 तास धोक्याचे मुंबई, 06 जुलै (हिं.स.) - जून महिना कोरडा
जलमय


जलमय


जलमय


धरणं


रेल्वे दरड


जलमय


- आवश्यकता असल्यास घराबाहेर पडावं, 'वर्क फ्रॉम होम'चा अवलंब करण्याचे आवाहन- उद्याही अलर्ट, नाशिकवर ढगफुटीचं संकट, उद्या त्र्यंबकेश्वर, सप्तश्रृंगी मंदिर भाविकांसाठी बंद- कोकण-मुंबईसाठी 48 तास धोक्याचे

मुंबई, 06 जुलै (हिं.स.) - जून महिना कोरडा ठाक गेल्यानंतर जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मुंबई, पुण्यासह संपूर्ण राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातलाय. मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊसाचं पाणी साचलं आहे. तर, काही ठिकाणी पूरस्थिती उद्भवली आहे. आजही आयएमडीकडून अनेक शहरांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर, काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे रायगड, चिपळूण, रत्नागिरीवर पुराच्या धोक्याचं सावट पसरलं आहे. तसेच, मुंबई-पुणे प्रवास सुखकर होण्यासाठी बांधण्यात आलेल्या मिसिंग लिंकवरही दरड कोसळल्यामुळे मुंबई-पुणे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. अशातच मुसळधार पावसाचा मुंबई लोकल ट्रेनवरही परिणाम झाला आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गही प्रभावित झाला आहे. अनेक रेल्वे रद्द करण्यात आली, तर काही रेल्वे आणि रस्ते वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली.

मुंबईसह ठाणे, पालघर त्याचबरोबर कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळं काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. कारण अनक ठिकाणी रस्त्यांवर घरांमध्ये पाणी शिरलं आहे. दरम्यान, या मुसळधार पावसामुळं काही भागात दुर्घटना देखील घडल्या आहेत. मुसळधार पावसामुळे झालेल्या दुर्घटनेत आत्तापर्यंत राज्यात 9 जणांचा बळी गेला आहे. तर 4 जण जखमी झाले आहेत. भिंत पडून 8 जणांचा बळी तर झाड पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

मुंबई उपनगरात भिंत पडून 6 जण, पुण्यामध्ये एक जण तर ठाण्यामध्ये एक जणाचा भिंत पडून मृत्यू झाला आहे. तर मुंबई उपनगरामध्ये झाड पडून आणखी एकाचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. गेल्या तीन ते चार दिवसापासून मुसळदार पाऊस सुरु आहे. या पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका सामान्य नागिकांना बसला आहे, अनेक ठिकाणी रस्त्यांना नदीचं स्वरुप आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळं वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे.

मानखुर्द भागात तीन मजली इमारतीचा भाग कोसळला, सहा जणांचा मृत्यू

मुंबईतील मानखुर्द भागात एका तीन मजली चाळीचा भाग कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. धोकादायक असलेली ही चाळ रिकामी करण्यासाठी घरातील सामान आवरत असतानाच अचानक पावसाने घात केला आणि संपूर्ण घर कोसळले. या ढिगाऱ्याखाली गाडले गेल्यामुळे 5 निष्पाप लहान मुले आणि एका महिलेसह 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान, या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. मानखुर्द पोलीस ठाण्यात गु.र.क्र. 425/2026 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई-पुणे वाहतूक ठप्प आहे. मिसिंग लिंकजवळ मोठी दरड कोसळली. दुसरीकडे मुंबई-पुणे रेल्वेसेवा देखील बंद आहे. राज्यात काही भागांत 8 तारखेपर्यंत मोठा इशारा देण्यात आला. दरड कोसळणे व सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे–मुंबई द्रुतगती मार्ग तसेच जुना मुंबई–पुणे महामार्ग या दोन्ही मार्गांवरील वाहतूक गंभीरपणे प्रभावित झाली आहे. पुणे–मुंबई तसेच मुंबई–पुणे या दोन्ही दिशेची वाहतूक काही वेळेसाठी पूर्णपणे बंद करण्यात आली होती.

पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नदी नाले ओसांडून वाहायला सुरुवात

पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असून नदी नाले ओसांडून वाहायला सुरुवात झाली आहे. तर जिल्ह्यातील वैतरणा तानसा सूर्या देहेरजा पिंजाळ या नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला असून तानसा नदीने आपली धोक्याची पातळी ओलांडलेली आहे तर वैतरणा नदी धोक्याच्या पातळीवर असून नदी काठावरील गावांमध्ये या नदीचे पुराचे पाणी शिरायला सुरुवात झाले आहे. जिल्हा प्रशासनाकडून नदी काठावरील गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. वैतरणा नदीला मोठा पूर आला आहे. वसई-विरारमधील अतिवृष्टीमुळे केवळ रेल्वेच नाही, तर रस्ते वाहतूकही पूर्णपणे कोलमडली आहे. रिक्षा, टॅक्सी आणि एसटी बस सेवा ठप्प झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. शहरात दुपारनंतरही पावसाचा कहर सुरूच असल्याने मुख्य महामार्गावर पाणी साचले आहे. परिणामी, अत्यावश्यक सेवा पुरवणारी वाहने शहरात येऊ शकलेली नाहीत. यामुळे वसई-विरारमध्ये आता दूध आणि भाजीपाल्याची तीव्र टंचाई निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे.

सततच्या पावसामुळे इंद्रायणी नदीला पूर

आळंदीत आज सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. मात्र, आता पावसाचा जोर काहीसा ओसरला असून सध्या रिमझिम पाऊस सुरू आहे. सततच्या पावसामुळे इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत असून मंदिर परिसरातही पाणी साचले आहे. दरम्यान, संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या उद्या आणि परवा पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार असल्याने आळंदीत हजारो वारकरी दाखल झाले आहेत. पार्श्वभूमीवर प्रशासनाने वारंवार आवाहन करत कोणत्याही परिस्थितीत इंद्रायणी नदीच्या पात्राजवळ किंवा घाट परिसरात जाण्याचा प्रयत्न करू नये, असे सांगितले आहे. याशिवाय, मुख्यमंत्री यांनीही वारकऱ्यांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. आळंदी आणि देहूकडे येण्यासाठी निघालेल्या वारकऱ्यांनी सध्याची पावसाची परिस्थिती लक्षात घेता आळंदी किंवा देहूत न येता पुण्यातूनच वारीत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पावसामुळे लोणावळा आणि मावळ तालुका परिसरात धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी लोणावळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अंतर्गत आदेश लागू केले आहेत. कलम 163 म्हणजे पर्यटनावर बंदी नसून पर्यटकांसाठी सुरक्षेच्या दृष्टीने निर्बंध लावण्यात आलेत. 6 जुलै रात्री 12 वाजल्यापासून 31 जुलै सकाळी 6 वाजेपर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत. त्यामुळे, आता लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांना धबधब्याच्या ठिकाणी किंवा धोकादायक पॉईंटवर जाता येणार नाही. तसेच, अशा ठिकाणी जाऊन सेल्फी काढणे किंवा व्हिडिओग्राफी, रिल्स बनवणे बंधनकारक करण्यात आलंय.

7 जुलै रोजी देखील मुंबई-एमएमआरमध्ये काही प्रमाणात मुसळधार पावसाच्या सरी आणि वारा असण्याची शक्यता आहे. 6 ते 7 जुलैदरम्यान मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज असल्यामुळे या भागातील काही धरणांमधून पाण्याचा विसर्ग उदभवू शकतो. त्यामुळे सतर्क राहावे. विशेषतः सखल भाग, दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या, तसेच घाट रस्त्यांवर प्रवास करताना विशेष काळजी घ्यावी, असं आवाहन शासनाकडून करण्यात आलं आहे.

नागरिकांनी भरतीच्या कालावधीत समुद्रकिनारी जाणे टाळावे. 6 ते 7 जुलैदरम्यान मुंबई-एमएमआर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात स्थानिक वाहतुकीत अडथळे निर्माण होण्याची तसेच काही प्रमाणात मालमत्ता नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मध्य महाराष्ट्र, मुंबई-एमएमआर, आणि कोकणातील नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहून नद्यांच्या पाणीपातळीत होणाऱ्या वाढीबाबत स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक प्रशासन किंवा आपत्कालीन नियंत्रण कक्षाशी तातडीने संपर्क साधावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.

मुंबई-पुण्यासह राज्यभरात अनेक ठिकाणी पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र आहे. हा पाऊस पुढचे दोन दिवस म्हणजे, 8 जुलै पर्यंत कायम राहण्याचा अंदाज आहे. अशा स्थितीत आपत्कालीन यंत्रणांनी 24 तास युद्धपातळीवर काम करावं, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. आवश्यकता असल्यास नागरिकांनी घराबाहेर पडावं, कर्मचाऱ्यांनी 'वर्क फ्रॉम होम'चा (Work From Home) अवलंब करावा असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande