झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, संजू सॅमसनला वगळले
नवी दिल्ली, 06 जुलै (हिं.स.)झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय टी-२० संघ जाहीर झाला आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली १५ सदस्यीय संघाची निवड करण्यात आली आहे. संघात काही मोठे बदल करण्यात आले आहेत. इंग्लंड दौऱ्यावर खेळणाऱ्या संघातील सहा क्रिकेटपटूंची झिम्
संजू सॅमसन


नवी दिल्ली, 06 जुलै (हिं.स.)झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय टी-२० संघ जाहीर झाला आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली १५ सदस्यीय संघाची निवड करण्यात आली आहे. संघात काही मोठे बदल करण्यात आले आहेत. इंग्लंड दौऱ्यावर खेळणाऱ्या संघातील सहा क्रिकेटपटूंची झिम्बाब्वे दौऱ्यासाठी निवड झालेली नाही. यामध्ये संजू सॅमसन, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, हर्षित राणा, अर्शदीप सिंग आणि प्रसिद्ध कृष्णा यांचा समावेश आहे. हर्षित आणि अर्शदीप यांना विश्रांती देण्यात आली आहे, तर उर्वरित क्रिकेटपटूंना वगळण्यात आले आहे. रिंकू सिंग, हर्ष दुबे, यश ठाकूर, अशोक शर्मा, मयंक यादव आणि प्रभसिमरन सिंग यांची निवड झाली आहे.

संजू सॅमसनला संघातून वगळणे ही एक मोठी बातमी आहे. मार्चमध्ये झालेल्या टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये तो सामनावीर ठरला होता. पण, आयर्लंडविरुद्धच्या दोन टी-२० आणि इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात अपयशी ठरल्यानंतर त्याला भारतीय प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले होते. आता त्याला संघातून वगळण्यात आले आहे. त्याच्या जागी प्रभसिमरन सिंगची निवड करण्यात आली आहे.

रिंकूचे भारतीय टी-२० संघात पुनरागमन झाले आहे. तो टी-२० विश्वचषकात खेळला होता. पण आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यांसाठी त्याची निवड झाली नव्हती. मयंक यादवचे दोन वर्षांनंतर पुनरागमन झाले आहे. त्याने २०१४ मध्ये बांगलादेश मालिकेमध्ये पदार्पण केले. पण दुखापतीमुळे त्याला संघाबाहेर राहावे लागले. तंदुरुस्त झाल्यानंतर तो आयपीएल २०२६ मध्ये खेळला होता.

हर्ष दुबे, अशोक शर्मा, यश ठाकूर आणि प्रभसिमरन यांसारख्या क्रिकेटपटूंचा भारतीय टी-२० संघात पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आहे. या चौघांनीही देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये सातत्याने प्रभावी कामगिरी केली आहे. हर्ष दुबेने अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत एकदिवसीय पदार्पण केले होते. अशोक शर्माने आयपीएल आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये आपल्या वेगाने छाप पाडली. यश ठाकूरनेही इंडिया 'अ' संघासाठी सातत्याने चांगली कामगिरी केली आहे.

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तीन सामन्यांची टी-२० मालिका २३ जुलैपासून खेळवली जाणार आहे. दुसरा सामना २५ जुलै रोजी आणि तिसरा सामना २६ जुलै रोजी खेळला जाईल. हे तिन्ही सामने हरारे येथे होणार आहेत.

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय टी-२० संघ

श्रेयस अय्यर (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा (उपकर्णधार), ईशान किशन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, रिंकू सिंग, हर्ष दुबे, वरुण चक्रवर्ती, प्रिन्स यादव, यश ठाकूर, अशोक शर्मा, मयंक यादव, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक).

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande