
श्रीनगर, 08 जुलै (हिं.स.) : जम्मू-काश्मीरमधील शोपियां जिल्ह्यातील सैदापोरा परिसरात सुरक्षा दलांनी सुरू केलेल्या पाच दिवसांच्या संयुक्त कारवाईत लष्कर-ए-तैयबाशी संबंधित एका दहशतवाद्याचा खात्मा केला. घटनास्थळावरून शस्त्रे आणि मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त करण्यात आला असून परिसरातील शोधमोहीम अद्याप सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
शोपियां जिल्ह्यात लष्कर-ए-तैयबाचे दोन स्थानिक दहशतवादी जंगल परिसरात लपल्याची माहिती शनिवारी सुरक्षा यंत्रणांना मिळाली. त्यानंतर सैन्य, पोलीस आणि सीआरपीएफने संयुक्तपणे परिसराला वेढा घालत व्यापक शोधमोहीम सुरू केली. या काळात 4 गावांतील नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने स्थलांतरित करण्यात आले. सुरक्षा दलांच्या माहितीनुसार, वेढ्यात अडकलेल्या दहशतवाद्यांची ओळख लतीफ आणि जाकीर अशी असून ते दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्याचे रहिवासी आहेत.
दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केल्यानंतर सुरक्षा दलांनी प्रभावी प्रत्युत्तर दिले.कारवाईदरम्यान आज, बुधवारी घटनास्थळी एका दहशतवाद्याचा मृतदेह आढळून आला. त्याची ओळख लष्कर-ए-तैयबाशी संबंधित दहशतवादी म्हणून झाली आहे. तसेच घटनास्थळावरून शस्त्रे आणि दारूगोळाही जप्त करण्यात आला.दरम्यान, परिसरात आणखी दहशतवादी लपून बसल्याची शक्यता लक्षात घेऊन सेनेच्या विशेष दहशतवादविरोधी ‘विक्टर फोर्स’च्या अतिरिक्त तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. संपूर्ण परिसर सुरक्षित केल्यानंतरच पुढील माहिती जाहीर करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी