
मुंबई, 08 जुलै (हिं.स.)।मुंबई विमानतळावर मंगळवारी संध्याकाळी एक मोठा अपघात टळला. एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसची दोन विमाने एकाच धावपट्टीवर समोरासमोर येण्याची वेळ आली होती. मात्र, हवाई वाहतूक नियंत्रण (एटीसी) कडून सूचना मिळाल्यानंतर एअर इंडियाच्या विमानाने उड्डाणाची प्रक्रिया (टेक-ऑफ रन) अर्धवट थांबवली, त्यामुळे संभाव्य दुर्घटना टळली.
सूत्रांच्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास घडली. सिलीगुडीहून आलेले एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान धावपट्टीवर उतरल्यावर ती पूर्णपणे रिकामी करण्यापूर्वीच त्याच धावपट्टीवरून दिल्लीकडे जाणारे एअर इंडियाचे विमान उड्डाणासाठी सज्ज झाले होते.मुंबई–दिल्ली मार्गावरील एअर इंडियाचे उड्डाण क्रमांक AI816 हे मोठ्या आकाराच्या बोईंग 777-300ER विमानाद्वारे चालवले जात होते. तर सिलीगुडी–मुंबई मार्गावरील एअर इंडिया एक्सप्रेसचे उड्डाण क्रमांक AIX1547 हे बोईंग 737 मॅक्स 8 या लहान आकाराच्या विमानाद्वारे संचालित केले जात होते.
या घटनेबाबत एअर इंडियाने निवेदन जारी केले आहे. सामाजिक माध्यमांवर माहिती देताना कंपनीने म्हटले आहे की, “७ जुलै रोजी मुंबईहून दिल्लीकडे जाणाऱ्या AI816 या उड्डाणाच्या वैमानिकांनी एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या सूचनेनुसार टेक-ऑफ रन थांबवला आणि विमान पुन्हा बे (पार्किंग क्षेत्र) मध्ये आणले. नियमानुसार आता विमानाची आवश्यक तपासणी करण्यात येईल. दरम्यान, प्रवाशांना शक्य तितक्या लवकर त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचवण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली जात आहे.” सामान्यतः टेक-ऑफ रन म्हणजे विमानाने उड्डाणासाठी आवश्यक वेग प्राप्त करण्यापूर्वी धावपट्टीवर वेगाने धावण्याची प्रक्रिया होय.
एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, एटीसीच्या निर्देशानंतरच उड्डाण प्रक्रिया थांबवण्यात आली होती. मात्र, या घटनेशी संबंधित इतर तपशील अद्याप समोर आलेले नाहीत. दोन्ही विमानांमध्ये एकूण किती प्रवासी होते, याची माहितीही तत्काळ उपलब्ध होऊ शकलेली नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode