
पेणमधील आयडीबीआय बँकेच्या एटीएम केंद्रातील घटना
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू
रायगड, १२ ऑगस्ट (हिं.स.)। एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी गेलेल्या महिलेची मदतीच्या बहाण्याने एटीएम कार्ड बदलून तब्बल ५० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना पेण नगरपालिका इमारतीमधील आयडीबीआय बँकेच्या एटीएम केंद्रात घडली. या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेण शहरातील प्रभुआळी परिसरात राहणाऱ्या महिला फिर्यादी पेण नगरपालिका इमारतीमधील आयडीबीआय बँकेच्या एटीएम केंद्रात पैसे भरण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी एटीएम केंद्रात एक अनोळखी इसम उपस्थित होता. त्याने पैसे भरण्यास मदत करण्याच्या बहाण्याने महिलेचा विश्वास संपादन केला.
महिलेचा विश्वास बसल्यानंतर संबंधित इसमाने हातचलाखीने त्यांचे एटीएम कार्ड बदलले. ही बाब महिलेच्या लक्षात येण्यापूर्वीच आरोपीने त्यांच्या मूळ एटीएम कार्डचा वापर करून बँक खात्यातून वेगवेगळ्या व्यवहारांद्वारे रक्कम काढली.
आरोपीने १५ हजार, १५ हजार, १५ हजार आणि ५ हजार रुपये, अशा चार व्यवहारांतून एकूण ५० हजार रुपये परवानगीशिवाय काढून घेतले. खात्यातून रक्कम काढली गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर महिलेने घटनेची माहिती पेण पोलिसांना दिली.
यानंतर पेण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १९६/२०२६ अन्वये भारतीय न्यायसंहिता २०२३ मधील कलम ३१८(४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध
फसवणूक करणारा आरोपी सफेद रंगाच्या रेषा असलेला शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स परिधान करून असल्याचे पोलिसांनी सांगितले. एटीएम केंद्रातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास अधिक पोलीस उपनिरीक्षक सुनील चव्हाण करीत आहेत.
दरम्यान, एटीएममध्ये अनोळखी व्यक्तीची मदत घेताना नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. एटीएम कार्ड कोणाच्याही हातात देऊ नये आणि व्यवहार पूर्ण झाल्यानंतर कार्ड आपलेच असल्याची खात्री करावी, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)