
रायगड, १२ ऑगस्ट (हिं.स.) : इन्स्टाग्रामवर मैत्री करून लग्नाचे आमिष दाखवत महिलेचा विश्वास संपादन केल्यानंतर तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा तसेच खोटी माहिती देऊन गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा गंभीर प्रकार नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत समोर आला आहे. याशिवाय शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या नावाखाली आरोपीच्या नावावर तब्बल ३७ लाख ३२ हजार ६३१ रुपये गुंतवण्यास महिलेला भाग पाडल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून फिर्यादी महिलेशी ओळख वाढवून मैत्री केली. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवत तिचा विश्वास संपादन केला. पुढे आरोपीने महिलेला आपल्या राहत्या घरी नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर लग्न करण्यास नकार दिल्याचाही आरोप आहे.
दरम्यान, आरोपीने खोटी माहिती देऊन विश्वास संपादन केला आणि महिलेला गर्भपात करण्यास भाग पाडल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. याशिवाय शेअर बाजारात गुंतवणूक करण्याच्या नावाखाली आरोपीच्या नावावर एकूण ३७ लाख ३२ हजार ६३१ रुपये गुंतवण्यास महिलेला भाग पाडल्याचा आरोप करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, आरोपीने यापैकी आतापर्यंत ३ लाख २९ हजार ९८२ रुपये परत केले आहेत. मात्र उर्वरित रक्कम स्वतः वापरून ती परत केली नसल्याचा आरोप महिलेने केला आहे. त्यामुळे या प्रकरणात आर्थिक फसवणुकीचाही आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १६४/२०२६ दाखल करण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ६९, ८८ आणि ३१६(२) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र पारखे पुढील तपास करीत आहेत. पोलिसांकडून प्रकरणातील आरोपांची सखोल चौकशी सुरू आहे.
-----------------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)