
माती व पाणी संवर्धनासाठी जनजागृती रॅली
विद्यार्थी आणि स्वयंसेवी संस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन
अकोला, १४ ऑगस्ट (हिं.स.) : मृद व जलसंधारणाची व्यापक जनचळवळ उभी करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासन आणि मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने २१ ऑगस्ट रोजी ‘महावॉकेथॉन–वॉक फॉर वॉटर’ या जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात नागरिक, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था आणि विविध सामाजिक संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले.
महावॉकेथॉनच्या नियोजनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे, जिल्हा मृद व जलसंधारण अधिकारी अमोल मस्कर, सहायक धर्मादाय आयुक्त महेश पाटील, तहसीलदार कुणाल झाल्टे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुषार जाधव, जिल्हा युवा अधिकारी अक्षय निपाणे, पोलिस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. निलेश पांडे, क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट्ट आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रसाद पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मृद व जलसंधारण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकररावजी नाईक यांचा जन्मदिन २१ ऑगस्ट हा ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त राज्यात १५ ते २१ ऑगस्टदरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’ आयोजित करण्यात येत आहे. हा सप्ताह प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयाने कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिले.
जिल्हा मृद व जलसंधारण अधिकारी अमोल मस्कर यांनी सांगितले की, महावॉकेथॉनसोबतच माती व पाणी संवर्धन विषयावर रील्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच कार्यक्रमादरम्यान जलसंधारणाच्या लोगोचे अनावरण आणि मृद व जलसंधारणाची सामूहिक शपथ घेण्यात येणार आहे.
क्रिकेट क्लब मैदानापासून रॅलीला सुरुवात
‘महावॉकेथॉन–वॉक फॉर वॉटर’ अंतर्गत २१ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता माती व पाणी संवर्धनाबाबत जनजागृतीपर रॅली काढण्यात येणार आहे. ही रॅली अकोला क्रिकेट क्लबच्या मैदानापासून सुरू होऊन एसटी बसस्थानक – अशोक वाटिका चौक – जिल्हाधिकारी कार्यालय – टॉवर चौक या मार्गाने पुन्हा क्रिकेट क्लब मैदानावर येऊन समाप्त होईल.
माती आणि पाणी संवर्धनाचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आयोजित या उपक्रमात अधिकाधिक अकोलेकरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे