राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात इनकमिंग सुरू; बिपीन गेहलोत यांच्यासह कार्यकर्त्यांचा प्रवेश
ठाणे, 15 ऑगस्ट (हिं.स.) - राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात सध्या जोरदार इनकमिंग सुरू झाले आहे. राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या सर्वसमावेशक विचारधारेला स्वीकारून बिपीन गेहलोत यांच्यासह ठाण्यातील
Thane


ठाणे, 15 ऑगस्ट (हिं.स.) - राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात सध्या जोरदार इनकमिंग सुरू झाले आहे. राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या सर्वसमावेशक विचारधारेला स्वीकारून बिपीन गेहलोत यांच्यासह ठाण्यातील विविध पक्षातील सुमारे 350 कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी गेहलोत यांचे पक्षात स्वागत केले. दरम्यान, यावेळी आरक्षणाच्या विरोधात बोलणारे लोक आपले शत्रू आहेत, असे प्रतिपादन डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी केले.

खारटन रोड, ठाणे पूर्व, वागळे इस्टेट आदी भागात कार्यकर्त्यांचे जाळे बिपीन गेहलोत यांनी विणले आहे. शोषित, पीडित, दलित वर्गाचे डाॅ.जितेंद्र आव्हाड हे एकमेव आश्वासक नेतृत्व सध्याच्या काळात दिसत असल्याचे सांगत गेहलोत यांनी हा पक्षप्रवेश केला. सिडको बस स्टाॅप येथील कोळी समाज हाॅलमध्ये हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी ठामपा गटनेते अभिजीत पवार, विरू वाघमारे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सुमारे 16 महिला बचत गटांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. या सर्वांना पक्षाचे मफलर घालून मनोज प्रधान यांनी स्वागत केले.

या प्रसंगी डाॅ.जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आज स्वातंत्र्याचा दिन आहे, १५ ऑगस्ट. याच दिवशी भारत स्वतंत्र झाला होता. पण गेल्या काही दिवसांत या देशात ज्या काही घटना घडल्या, त्यामुळे मनाला खूप वेदना होतात. आपण स्वतंत्र झालो, पण आपली मानसिकता सुधारलेली नाही. काही दिवसांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई, जे मागासवर्गीय समाजाचे होते, त्यांच्यावर एका माणसाने उठून चप्पल फेकून मारली होती. कारण, या खुर्चीवर तुम्ही कसे बसू शकता? असा त्याचा सवाल होता. पण, आपण म्हणतो, ती खुर्ची काय कोणाच्या बापाची लिहिलेली आहे का? सर्वात वाईट गोष्ट गेल्या १५ दिवसांत घडली, ती म्हणजे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, तेसुद्धा मागासवर्गीय समाजाचे आहेत, ते जिथे भाषण करण्यासाठी गेले, त्या जागेवर यज्ञ करून ती जागा पवित्र करण्याचे काम काही लोकांनी केले.

भारत स्वतंत्र झाला. पण आपण जातीपातीच्या मानसिकतेतून जोपर्यंत बाहेर येत नाही, तोपर्यंत स्वातंत्र्याचा खरा अर्थ सामान्य माणसाला समजणार नाही. आम्हाला गांधी आणि नेहरूंनी स्वातंत्र्य दिले. आमच्या डाॅ. बाबासाहेबांनी आम्हाला संविधान देऊन समता आणि समानतेचा धडा दिला, पण हे संविधान नष्ट करण्याचे पाप करणारे लोक आज या देशात वाढत आहेत. 'संविधान आम्ही मानत नाही' असे म्हणणारे लोक जोरजोराने बाहेर येऊ लागले आहेत. जातीयवादी शक्तीची मानसिकता कधीच बदलू शकत नाही. कधीच बदलू शकत नाही.

आपला लढा या मानसिकतेच्या विरोधात आहे. हा लढा, कोणी मानो किंवा न मानो, हा लढा मनुवादाच्या विरोधात आहे. आमचा ब्राम्हणांना कोणताही विरोध नाही. पण मनुवादाचा विरोध आपण करीत राहणार आहोत. जीव गेला तरी बेहत्तर पण विषमतावादी मनुवादाचा विरोध करीतच राहणार आहोत.

जो स्त्रीला स्त्री मानत नाही, तिला केवळ उपभोगाची वस्तू मानतो, त्या मनुस्मृतीचा आपण स्वीकार करणार नाही.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिल्यांदा मनुस्मृती जाळली. त्यांनी पहिल्यांदा महिलांना अधिकार दिले. त्यांनी पहिल्यांदा आरक्षण दिले. आजही जर न्या. गवई यांना चप्पल मारली जाते, खरगेंसाठी यज्ञ केला जातो, तर आरक्षणाची गरज आहे की नाही, तुम्हीच सांगा! जे आरक्षणाच्या विरोधात बोलतात, आरक्षण काढून टाकण्याची भाषा करतात, ते तुमचे आणि आमचे शत्रू आहेत, एवढे लक्षात ठेवा, असे डाॅ.जितेंद्र आव्हाड म्हणाले.

तर, जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी, आज आपल्या देशाचा 80 वा स्वातंत्र्य दिन आहे. देश स्वतंत्र झाला. पण, आपल्या ठाण्याचे काय? विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या जोखडाखाली असलेले आपले ठाणे शहर आजही पारतंत्र्यात आहे, असा संशय निर्माण होत आहे. गेली 35 वर्षे सत्तेत असलेले लोक आपल्या शहराचा विकास करू शकलेले नाहीत. शहराचा विकास करण्याच्या नावाखाली स्वतःचा विकास करण्याच्या मागे हे लोक लागले आहेत. खारटन रोड हे त्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. आपल्याला याच जोखडातून खारटन रोडला स्वतंत्र करून विकसित करायचे आहे, असे सांगितले.

मी विद्यार्थी चळवळीतून आलो आहे. आमच्या चळवळीला खारटन रोडवरील नागरिकांनी मदत केली. मी पक्षाचा ठाणे अध्यक्ष म्हणून काम करताना ज्या माणसांमुळे आपल्याला बळ मिळेल, असे वाटते. त्यातील एक नाव म्हणजे बिपीन गेहलोत! समाजासाठी काम करताना त्याला राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष योग्य वाटला. हे नक्कीच स्पृहणीय आहे. सत्ताधाऱ्यांना खिंडीत पकडणारा आमचा पक्ष आहे. आमची ऊर्जा डाॅ.जितेंद्र आव्हाड हे आहेत. तुम्हा नागरिकांसाठी आम्ही कायम लढणार आहोत. या परिसराचा पुनर्विकास आणि समाजविकासासाठी आम्ही सोबत राहणार आहोत. पुढील नगरसेवक हा बिपीनच असणार आहे, हे ठामपणे सांगतो, असे मनोज प्रधान म्हणाले.

यावेळी मकसूद खान, फुलबानो पटेल आदी मंचावर उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande