
ढाका, 20 ऑगस्ट (हिं.स.)बांगलादेशच्या सत्तेतून बाहेर पडल्यानंतर माजी अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस आणि त्यांच्या निकटवर्तीयांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ढाक्यातील धनमंडी 32 येथील शेख मुजीबुर रहमान मेमोरियल म्युझियमची तोडफोड आणि जाळपोळ केल्याप्रकरणी त्यांना मास्टरमाइंड असल्याचा आरोप करण्यात आला आहे.याप्रकरणी मोहम्मद युनूस, माजी कायदा सल्लागार डॉ. आसिफ नजरुल यांच्यासह 27 जणांविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
रिपोर्टनुसार, तमन्ना चौधरी प्रियांका नावाच्या महिलेने राजधानीतील मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट मोहम्मद ज्वेल राणा यांच्या न्यायालयात ही याचिका दाखल केली. न्यायालयाने तिचा जबाब नोंदवून घेतला असून, आदेश राखून ठेवला आहे.या प्रकरणातील इतर आरोपींमध्ये माजी अंतरिम सरकारच्या सल्लागार डॉ. रिजवाना हसन, माजी प्रेस सचिव शफीकुल आलम, माजी गृह सल्लागार लेफ्टनंट जनरल जहांगीर आलम चौधरी, सांस्कृतिक व्यवहार सल्लागार मुस्तफा सरवर फारुकी, एनसीपीचे संयोजक नाहिद इस्लाम, प्रवक्ते आसिफ महमूद, माजी सल्लागार महफूज आलम यांच्यासह अन्य व्यक्तींचा समावेश आहे.
याचिकेनुसार, 5 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री सुमारे 3,000 ते 5,000 लोक धनमंडी 32 येथे बेकायदेशीरपणे जमले होते. त्यांच्या हातात काठ्या, हातोडे आणि इतर शस्त्रे होती, असा आरोप करण्यात आला आहे. मोहम्मद युनूस आणि इतर आरोपींच्या समर्थनामुळे व इशाऱ्यामुळे हे लोक तेथे जमल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.तक्रारीनुसार, या जमावाने रात्री सुमारे 10 वाजता इमारतीत प्रवेश केला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात तोडफोड करून इमारतीला आग लावण्यात आली. तसेच तेथे असलेल्या मौल्यवान वस्तूंची लूट करण्यात आल्याचा आरोप आहे.
इमारत पाडण्यासाठी बुलडोझर, हातोडे आणि इतर अवजड यंत्रसामग्री आणण्यात आली होती, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. दुसऱ्या दिवशी सायंकाळी सुमारे 5 वाजेपर्यंत संपूर्ण इमारत ढिगाऱ्यात रूपांतरित झाली होती. काही आरोपींनी तोडफोड, जाळपोळ आणि लुटीला प्रोत्साहन देण्यासाठी यूट्यूब आणि फेसबुक लाइव्हस्ट्रीमचा वापर केला. त्यासाठी निधी पुरवण्यात आल्याचाही दावा करण्यात आला आहे.या हल्ल्याची पूर्वसूचना देण्यात आली होती, तरीही इमारतीच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या व्यक्तींनी घटना रोखण्यासाठी कोणतीही पावले उचलली नाहीत, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
बांगलादेशच्या सत्तेत असताना मोहम्मद युनूस यांनी राजकीय शक्तींना त्यांच्या अटी लादण्याची मुभा दिली, असा आरोप करण्यात येतो. त्यामुळे ढाका आणि नवी दिल्ली यांच्यातील संबंधांमध्ये तणाव वाढला. अनेक प्रसंगी त्यांनी भारताविरोधात वक्तव्ये केली. तसेच पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयला भारताविरोधात योजना आखण्यासाठी ढाक्याची जमीन उपलब्ध करून दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.बांगलादेशच्या सत्तेत असताना मोहम्मद युनूस यांनी बांगलादेशला या प्रदेशातील एक महत्त्वाचा केंद्रबिंदू म्हणून मांडले होते. बांगलादेशचा खुला समुद्र हा या क्षेत्रातील जागतिक व्यापारासाठी मुख्य प्रवेशद्वार असल्याचा त्यांनी दावा केला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode