
कीव, 20 ऑगस्ट (हिं.स.)।रशियाने बुधवारी रात्री युक्रेनची राजधानी कीववर मोठा क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यात किमान १२ जणांचा मृत्यू झाला आहे. रात्रभर राजधानीत स्फोटांचे आवाज घुमत होते. स्थानिक अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. युक्रेनच्या आपत्कालीन सेवेनुसार, या हल्ल्यात किमान ३३ जण जखमी झाले आहेत. गुरुवारी पहाटेपर्यंत हवाई हल्ल्याचा इशारा कायम होता.
कीवमधील दार्नित्स्की, स्वियातोशिन्स्की आणि सोलोमियान्स्की जिल्ह्यांमध्ये झालेल्या हल्ल्यांमुळे १२ ठिकाणांचे नुकसान झाले. यामध्ये निवासी इमारती, एक वैद्यकीय केंद्र आणि एका शैक्षणिक संस्थेचा समावेश आहे. आपत्कालीन पथकांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांची सुटका केली.
कीवची हवाई संरक्षण यंत्रणा कमकुवत करण्याच्या उद्देशाने रशियाने राजधानीवरील क्षेपणास्त्र हल्ले तीव्र केले आहेत. कीवकडे क्षेपणास्त्र हल्ले रोखण्यास सक्षम असलेल्या हवाई संरक्षण यंत्रणांची संख्या मर्यादित आहे. त्यातच अमेरिकेत निर्मित पॅट्रियट हवाई संरक्षण यंत्रणांसाठी लागणाऱ्या क्षेपणास्त्रांचा पुरवठाही सातत्याने मर्यादित राहिला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनला पॅट्रियट हवाई संरक्षण यंत्रणांच्या उत्पादनासाठी परवाना देण्यास परवानगी दिली होती; मात्र नंतर त्यांनी हा निर्णय मागे घेतला. दरम्यान, युक्रेनने रशियाच्या हद्दीतील लष्करी तळ, शस्त्रसाठे आणि इतर सामरिक ठिकाणांवर लांब पल्ल्याचे हल्ले करण्याची मोहीम अधिक तीव्र केली आहे. युक्रेनच्या शहरांवर हल्ले सुरू ठेवण्याची मॉस्कोची क्षमता कमकुवत करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.
सोलोमियान्स्की जिल्ह्यातील एका नऊ मजली निवासी इमारतीचे वरचे दोन मजले उद्ध्वस्त झाले. इमारतीच्या इतर मजल्यांवरही आग लागली. दोन निवासी इमारती आणि एका शाळेतील आश्रयस्थळीही काही नागरिक अडकले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode