
अमरावती, 24 ऑगस्ट (हिं.स.)।अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयातील (डफरीन) नवजात शिशू अतिदक्षता विभागात (SNCU) लागलेल्या भीषण आगीत बालकांचा झालेला दुर्दैवी मृत्यू अत्यंत वेदनादायी, मन हेलावून टाकणारा आणि तितकाच धक्कादायक आहे. या अत्यंत दुर्दैवी घटनेवर भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि विधान परिषदेचे आमदार प्रवीण पोटे पाटील यांनी अतिशय संवेदनशील शब्दात तीव्र दुःख व शोक व्यक्त केला आहे.
या कठीण प्रसंगी आरोप-प्रत्यारोपांची किंवा राजकारण करण्याची मुळीच नाही.
*ज्या माता-पित्यांनी आपली चिमुकली बाळे गमावली आहेत, त्यांच्या तीव्र वेदनांची भरपाई कशानेही होऊ शकत नाही. मी वैयक्तिकरीत्या आणि एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून या दुःखात पूर्णपणे त्यांच्या पाठीशी उभा आहे. ईश्वर या माता-पित्यांना हे दुःख सहन करण्याची ताकद देवो.*या घटनेतील मृत बालकांच्या नातेवाईकांना तसेच सध्या उपचाराधीन असलेल्या जखमी बालकांना सर्वोत्कृष्ट वैद्यकीय सुविधा मिळवून देण्यासाठी वैयक्तिक पातळीवर आणि राज्य सरकारच्या वतीने सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.चौकशीनंतर या घटनेतील त्रुटी आणि आगीचे नेमके कारण समोर येईलच. भविष्यात अशा भयानक आणि दुर्दैवी दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी राज्य सरकार रुग्णालयांच्या सुरक्षेबाबत अत्यंत कठोर आणि दीर्घकालीन उपाययोजना अंमलात आणेल.
नागरिकांना आणि लोकप्रतिनिधींना संवेदनशीलतेचे आवाहन....
हा क्षण टीकेचा किंवा राजकीय चिखलफेकीचा नाही, तर एक जबाबदार आणि संवेदनशील नागरिक म्हणून पीडित कुटुंबांना धीर देण्याचा आहे. सध्या आमचे संपूर्ण लक्ष जखमी बालकांना त्वरित उपचार मिळवून देणे आणि पीडित पालकांना मानसिक व व्यावहारिक आधार देण्यावर केंद्रित आहे, असेही आमदार प्रवीण पोटे पाटील यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी