
* २० सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे आवाहन
मुंबई, 26 ऑगस्ट (हिं.स.) - म्हाडाचा विभागीय घटक मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे बृहतसूचीवरील संक्रमण शिबिरात वास्तव्यास असणार्या मूळ भाडेकरु/ रहिवासी अथवा त्यांचे वारसदार यांची पात्रता निश्चिती करून सदनिका वितरणासाठी दि. १ सप्टेंबर, २०२६ रोजी सकाळी दहा वाजेपासून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जदारांना ऑनलाईन नोंदणी व अर्ज भरण्याकरिता masterlist.mhada.gov.in या मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दि. २० सप्टेंबर, २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील उपकरप्राप्त इमारतीमधील ज्या भाडेकरु/ रहिवासी यांना निष्कासन सूचना (व्हेकेशन नोटीस) देऊन इमारत खाली करण्यात आलेली आहे व त्यांच्या मूळ इमारतीचा अरुंद भूखंड, आरक्षण, रस्ता रुंदीकरण इत्यादी कारणामुळे पुनर्विकास शक्य नाही. तसेच उपकरप्राप्त इमारती पुनर्रचित झालेल्या आहेत, परंतु, कमी सदनिका बांधण्यात आल्या आहेत अशा वंचित मूळ भाडेकरु, रहिवासी यांना यापूर्वी मंडळाद्वारे पुनर्रचित, पुनर्विकसित इमारतीमध्ये कायमस्वरुपी सदनिका देण्यात आलेली नाही व त्यांचे वारसदार संक्रमण शिबीरात स्वतः अधिवास धारण करीत आहेत, अशा बृहतसुचीवरील ख-याखु-या मूळ भाडेकरु, रहिवासी अथवा त्यांचे वारसदार यांच्यासाठी सदर ऑनलाइन अर्ज प्रकिया राबविण्यात येत आहे.
मंडळातर्फे ऑनलाईन अर्ज करण्याच्या कार्यपद्धती नुसार अर्जदारांनी म्हाडाच्या www.mhada.gov.in. या संकेतस्थळावर citizen corner मध्ये जाऊन Application for Masterlist या पर्यायावर Click करुन नोंदणी (Registration)करावी. तसेच नोंदणीची सुविधा masterlist.mhada.gov.in या संकेतस्थळावर देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नोंदणी पूर्ण झाल्यानंतर दुसर्या टप्प्यांतर्गत लॉगिन (Login) करावयाचे आहे. यासाठी नोंदणी करतेवेळी वापरलेला e-mail ID व पासवर्ड (Password) वापरावा. याकरिता हा ई-मेल आयडी व पासवर्ड जतन करुन ठेवावा. यशस्वी Login केल्यानंतर अर्ज करण्यासंबंधी मार्गदर्शक सुचना व कार्यपध्दती [Guidelines/ User Manual] स्क्रीन दिसून येतील त्यानुसार अर्ज भरावयाचा आहे. अर्जामध्ये संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर हा अर्ज submit या विकल्पाद्वारे सादर करावयाचा आहे.
अर्ज यशस्वीरित्या Submit केल्यानंतर, अर्जदाराने स्वतः प्रमाणित केलेले, अर्जासोबत ऑनलाईन सादर केलेले कागदपत्र प्रत्यक्ष रित्या ३० दिवसांच्या कालावधीत कक्ष क्र. ३७२, दुसरा मजला, म्हाडा मुख्यालय, गृहनिर्माण भवन, कलानगर, वांद्रे पूर्व, मुंबई - ५१ येथे सादर करावेत. सुनावणीच्या वेळेस अर्जदाराने सर्व अपलोड केलेल्या कागदपत्रांच्या मूळ प्रती व त्यासंबंधीत कागदपत्रे सोबत आणणे बंधनकारक आहे. अर्जदाराची पात्रता व पुनर्रचित, पुनर्विकसित सदनिकेचे वितरण याबाबत म्हाडा अधिनियम १९७६ व विनियम १९८१ तसेच शासनाचे व म्हाडाच्या नवीन धोरणातील तरतुदीमधील धोरणानुसार गुणवत्तेवर निर्णय घेण्यात येईल, असे मंडळातर्फे कळविण्यात आले आहे.
नोंदणी करतेवेळी अर्जदाराकडे वैध मोबाईल नंबर आणि ई-मेल पत्ता असणे आवश्यक आहे. अर्जदाराचा रंगीत फोटो (jpeg format), अर्जदाराचे हस्ताक्षर किंवा अंगठ्याचा ठसा आदीचा फोटो (jpeg format),आधार कार्ड (pdf Format), व्हेकेशन नोटीस, जुन्या इमारतीतील गाळ्यांची भाडेपावती, विद्युत देयक, संक्रमण शिबीरातील गाळ्याचे वितरण आदेश व ताबा पावती (pdf Format), हस्तांतरण करारनामा (Transfer Agreement)(pdf ) इत्यादी कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
मंडळातर्फे आवाहन करण्यात येत आहे की, यापूर्वी बृहतसूची समितीने पात्र घोषित केलेल्या अर्जदारांनी तसेच ज्या अर्जदारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज दाखल केला आहे, अशा अर्जदारांनी पुनश्च नव्याने अर्ज दाखल करु नये. मात्र, ज्या अर्जदारांनी यापुर्वी बृहतसुचीकरीता ऑफलाईन पध्दतीने अर्ज केलेला आहे परंतु त्यांचे प्रकरण अद्याप प्रलंबित आहे, अशा व्यक्तींनी नव्याने ऑनलाईन अर्ज दाखल करावयाचा आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी