
* सरकार आणि उद्योगांमधील दुवा म्हणून करणार पाठपुरावा
मुंबई, 26 ऑगस्ट (हिं.स.) - पुण्यातील महत्त्वाच्या आणि वेगाने विकसित होणाऱ्या चाकण औद्योगिक क्षेत्रातील प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर ही (MACCIA) महत्त्वपूर्ण भूमिका पार पडणार आहे. यासंदर्भात स्थानिक औद्योगिक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत नुकतीच एक बैठक पार पडली असून, चाकण दौऱ्यावर आलेल्या उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी सविस्तर चर्चा केली. यावेळी उद्योजकांच्या अडचणींबाबत सरकार आणि उद्योगांमधील दुवा म्हणून महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स पाठपुरावा करणार आहे.
चाकण औद्योगिक परिसरातील वाहतूक कोंडी, पायाभूत सुविधांची दुरवस्था, वीज आणि पाण्याच्या पुरवठ्यातील त्रुटी यांसारख्या अनेक मूलभूत समस्यांमुळे स्थानिक उद्योजकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने स्थानिक संघटनांशी समन्वय साधत या प्रश्नांवर मार्ग काढण्याची तयारी दर्शवली आहे. राज्य सरकार आणि उद्योग जगतातील एक मजबूत दुवा म्हणून चेंबर या समस्या प्रशासनाकडे लावून धरणार आहे.
या पुढाकाराबद्दल बोलताना महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रवींद्र माणगावे म्हणाले, चाकण हे महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीचे मुख्य केंद्र आहे, मात्र तेथील पायाभूत सुविधा आणि स्थानिक समस्यांमुळे उद्योगांच्या विस्तारावर परिणाम होत आहे. स्थानिक असोसिएशनशी चर्चा करून आम्ही सर्व महत्त्वाचे मुद्दे एकत्रित केले आहेत आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी यावर सकारात्मक चर्चा झाली आहे. राज्य सरकार आणि उद्योजक यांच्यात एक भक्कम पूल म्हणून काम करत चाकणमधील समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र चेंबर सातत्याने पाठपुरावा करेल.
या बैठकीत आणि झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे चाकणमधील उद्योजकांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. चेंबरच्या या सक्रिय मध्यस्थीमुळे चाकण औद्योगिक क्षेत्राचे प्रश्न येत्या काळात वेगाने सुटतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत यांचे आभार
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने स्थानिक उद्योजकांच्या या समस्या उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या निदर्शनास आणल्या. दरम्यान उदय सामंत यांच्यासोबत MACCIA आणि चाकण औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांचे प्रतिनिधी व संचालक यांची तत्काळ बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत तत्काळ उपाययोजना व नेहमीच अतिशय जलद गतीने प्रश्नाला समस्यांचे निराकरण केल्याबद्दल महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स व चाकणच्या उद्योजकांच्या वतीने महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष रवींद्र माणगावे यांनी उदय सामंत यांचे आभार मानले. या बैठकीत चाकण एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे, धनराज शेडबाळे, शंतनू कुलकर्णी, रामेश्वर पवार तसेच कुणाल हे हजर होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी