

लासलगाव, २६ ऑगस्ट (हिं.स.) : केंद्र सरकारच्या किंमत स्थिरीकरण निधीअंतर्गत लासलगावहून दिल्लीच्या आदर्श नगरकडे ४५० मेट्रिक टन कांदा घेऊन जाणारी २१ वॅगनची विशेष ‘कांदा एक्सप्रेस’ प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख गणेश निंबाळकर यांनी रेल्वे रुळावर ठिय्या देत रोखली. कांदा खराब व नासका असल्याचा आरोप करत गुणवत्ता तपासल्याशिवाय रेल्वे सोडू नये, अशी मागणी त्यांनी केली. या आंदोलनामुळे सुमारे पाऊण तास रेल्वे वाहतूक खोळंबली होती.
लासलगाव, निफाड, सिन्नर, चांदवड, उमराणा, सटाणा, नामपूर व सायखेडा परिसरातून आणलेला कांदा ४० किलोच्या गोण्यांमध्ये भरून २० ते २५ ट्रकद्वारे रेल्वेच्या वॅगनमध्ये लोड करण्यात आला होता. केंद्रीय वखार महामंडळाचे कार्यकारी संचालक अजय जाडू, तांत्रिक विभाग प्रमुख निरुपाल यादव, उपप्रबंधक हिमांशू कामत आणि स्टेशन मास्तर प्रितेश दुबे यांच्या उपस्थितीत गाडी रवाना करण्याची तयारी सुरू असताना गणेश निंबाळकर यांनी इंजिनसमोर ठिय्या मांडला.
मध्य प्रदेशातून पाच ते सहा रुपये किलो दराने खरेदी केलेला कांदा २१ रुपये किलो दराने खरेदी केल्याचे दाखवले जात असल्याचा आरोप निंबाळकर यांनी केला. तसेच नाफेड, केंद्रीय वखार महामंडळाचे अधिकारी आणि कांदा खरेदी करणाऱ्या कंपन्यांमध्ये संगनमत असल्याचाही आरोप त्यांनी केला.
रेल्वे सुरक्षा दलाचे उपनिरीक्षक रोहीतकुमार यांनी निंबाळकर यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते आंदोलनावर ठाम राहिले. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते, पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे आणि निफाडचे पोलीस निरीक्षक अभिजीत सोनवणे अतिरिक्त कुमक घेऊन घटनास्थळी दाखल झाले.
दंगा काबू पथकाच्या मदतीने आंदोलकांना रेल्वे रुळावरून हटविण्यात आले. या कारवाईदरम्यान गणेश निंबाळकर यांच्या पायाला दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर दुपारी ३.१० वाजता ‘कांदा एक्सप्रेस’ दिल्लीच्या दिशेने रवाना झाली.
या प्रकरणातील आरोपांबाबत संबंधित अधिकाऱ्यांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI