
रायगड, 27 ऑगस्ट (हिं.स.)। जिल्ह्यात रिक्त असलेल्या ‘आपले सरकार सेवा केंद्रां’साठी इच्छुक नागरिकांनी ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने अर्ज करणे अनिवार्य आहे. आवश्यक कागदपत्रांसह अर्ज ३० सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग येथे जमा करावेत, अशी माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली.
महाराष्ट्रातील महा ई-सेवा केंद्रे, सेतू सुविधा केंद्रे, नागरी सुविधा केंद्रे आणि संग्राम केंद्रांना ‘आपले सरकार सेवा केंद्र’ हे एकसमान नाव देण्यात आले असून त्यांचे ब्रँडिंगही एकसारखे करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातील सध्या रिक्त असलेल्या केंद्रांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रत्येक ग्रामपंचायत व नगरपंचायत क्षेत्रात किमान दोन केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. २०११च्या जनगणनेनुसार पाच हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या क्षेत्रात किमान चार केंद्रे असतील. तसेच महानगरपालिका आणि नगरपरिषद क्षेत्रात दहा हजार लोकसंख्येमागे दोन केंद्रे स्थापन करण्याचे नियोजन आहे.
आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज मागविण्याचा कालावधी १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२६ असा आहे. प्राप्त अर्जांची छाननी १ ते १५ ऑक्टोबरदरम्यान, तर जिल्हास्तरीय कार्यवाही १६ ते ३० ऑक्टोबरदरम्यान करण्यात येणार आहे.शासनाच्या २७ मार्च २०२५च्या निर्णयानुसार रायगड जिल्ह्यात विविध तालुक्यांमध्ये मोठ्या संख्येने नवीन केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. त्यामध्ये अलिबागमध्ये २६, कर्जतमध्ये ४३, खालापूरमध्ये ४५, महाडमध्ये ११८, माणगावमध्ये ३४ आणि म्हसळ्यात ३३ अतिरिक्त केंद्रांचा समावेश आहे.
त्यामुळे स्थानिक नागरिकांना शासकीय सेवा अधिक सुलभपणे उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. अर्ज भरताना तांत्रिक अडचणी आल्यास इच्छुकांनी जिल्हा माहिती तंत्रज्ञान कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग येथे संपर्क साधावा आपले सरकार सेवा केंद्रांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://raigad.gov.in, या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे., असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)