
लातूर, 27 ऑगस्ट (हिं.स.)। शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मदतीने कृषी विद्यापीठांनी विकसित केलेले तंत्रज्ञान आपल्या शेतीमध्ये राबवावे व अधिक उत्पादनक्षम बनून आपले आर्थिक स्थैर्य उंचवावे, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य सई गोरे यांनी केले आहे.
द आशिव (ता. औसा) येथे राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया २०२६-२७ अंतर्गत सोयाबीन पिकासंदर्भात शेतकऱ्यांचे प्रशिक्षण मंडल कृषी अधिकारी बेलकुंड या कार्यालयामार्फत आयोजित करण्यात आले होते. त्या प्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जिल्हा अधक्षिक कृषी अधिकारी दिलीप जाधव हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य उजनी गट संदिपान शेळके, औसा पंचायत समितीच्या सभापती गंगा कोदळीकर, पंचायत समिती सदस्य परमेश्वर लांडगे, आशिवचे रमेश वळके पाटील, उपसरपंच विनोद जगताप, औसा बाजार समितीचे संचालक प्रवीण कोपरकर हे उपस्थित होते.
यावेळी कृषी अधिकारी जाधव म्हणाले की, खाद्यतेलास आहारात अनन्यसाधारण महत्त्व असून उत्तम दर्जाच्या खाद्य तेलासाठी विविध तेलबियाचे गुणवत्ता पूर्ण उत्पादन महत्त्वाचे आहे. यासाठी उत्पादन खर्च कमी करून अधिक उत्पन्न मिळविणे अत्यंत आवश्यक आहे. सोयाबीन सारख्या पिकाची शास्रोक्त पद्धतीने लागवड करून, आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास यावर निश्चीतच मार्ग निघेल असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. या शेतकरी प्रशिक्षणात डॉ. वसंत सूर्यवंशी यांनी सोयाबीन व तूर लागवड तंत्रज्ञानाबद्दल माहिती देऊन सध्याच्या कमी पावसाच्या परिस्थितीवर खरीप हंगामातील
पिकांची शेतकऱ्यांनी काळजी कशी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन केले. सोबतच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरेही दिली. कृषी महाविद्यालयातील कीटक शात्रज्ञ विजय भामरे यांनी सोयाबीन आणि तूर पिकावरील कीड व रोग याबद्दलचे सादरीकरण करून शेतकऱ्यांना किडींचा जीवनक्रम, किडीचा उद्रेक वाढण्याची कारणे, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन याबद्दल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय असलेला रेशीम उद्योग यासंबंधीची माहिती आणि विविध योजना याबद्दल जिल्हा रेशीम विकास अधिकारी शंकर वराट यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. प्रशिक्षणाच्या वेळी बेलकुंड मंडळातील प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कारही करण्यात आला. तालुका कृषी अधिकारी औसा दत्तात्रय हाके यांनी प्रास्ताविक केले तर सूत्रसंचालन मनोज लोखंडे यांनी केले. शेवटी मंडल कृषी अधिकारी बेलकुंड विकास लटूरे यांनी आभार मानले.
सोयाबीन गट प्रात्यक्षिकांमधील निवडण्यात आलेले आशिव, उजनी, माळुंब्रा, बिरवली, टाका व गुळखेडा येथील शेतकरी उपस्थित होते. सध्याचे चालू वर्ष हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. याचाच भाग म्हणून सदर प्रशिक्षणात महिला शेतकरी हजर होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उप कृषि अधिकारी रवी चव्हाण, सतीश घुले आणि सहाय्यक कृषी अधिकारी सुधाकर घोडके, प्रवीण बनकर, अजय गोरे, गुरुदत्त चौधरी, खंडेराव टेकाळे, चंद्रकला लातुरे, शितल जगताप, सागर जवादे, आशिष काळदाते, अजिक्य भोसले, गोपाळ शेवाळे, आर. व्ही जाधव यांच्याबरोबरच आशिव येथील शेतकरी नामदेव माने, नितीन वळके, मनोज लोखंडे, मनोज दूधभाते पवनमाने आदींनी परिश्रम घेतले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis