
लातूर, 27 ऑगस्ट (हिं.स.)। कृषी क्षेत्रात केवळ नोकरीच्या संधी शोधण्याऐवजी कृषी क्षेत्रातील समस्यांमधून व्यवसायाच्या संधी शोधा आणि रोजगार निर्माते बना, असे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाचा कृषी भूषण पुरस्कार प्राप्त श्रीकृष्ण शिंदे यांनी केले. पदव्युत्तर कृषी व्यवसाय व्यवस्थापन संस्था चाकूर येथे आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.
शिंदे म्हणाले की कृषी क्षेत्रामध्ये झपाट्याने होत असलेले तांत्रिक बदल, वाढत्या बाजारपेठेच्या संधी, बदलती ग्राहकांची मागणी आणि हवामानातील बदल यामुळे आजच्या काळात शेतीकडे केवळ पारंपरिक व्यवसाय म्हणून न पाहता एक आधुनिक, सक्षम, शाश्वत आणि लाभदायक व्यवसाय म्हणून पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. आपल्या मार्गदर्शनात शिंदे यांनी विद्यार्थ्यांना शेतीकडे पाहण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलण्याचे आवाहन केले. 'शेती म्हणजे केवळ पिकांचे उत्पादन घेणे नाही तर उत्पादनापासून बाजारपेठेपर्यंत संपूर्ण मूल्यसाखळी समजून घेऊन त्यातून अधिकाधिक मूल्य निर्माण करणे
शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा
योग्य वापर, पिकांचे विविधीकरण, उत्पादनाची गुणवत्ता, प्रक्रिया व मूल्यवर्धन, बाजारपेठेचा अभ्यास, ग्राहकांच्या गरजा, ब्रँडिंग, थेट विक्री आणि प्रभावी व्यवस्थापन या बाबींवर त्यांनी विशेष भर दिला. कृषी क्षेत्रामध्ये तंत्रज्ञान, संशोधन, नवोपक्रम, उद्योजकता, व्यवस्थापन कौशल्य यांचा योग्य समन्वय साधल्यास 'शेतीपासून समृद्धीकडे' वाटचाल शक्य आहे असे प्रतिपादन श्रीकृष्ण शिंदे यांनी केले.
या कार्यक्रमास संस्थेचे अधष्ठाता डॉ. संतोष कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या व्याख्यानमालेचा मुख्य उद्देश कृषी व्यवसाय व्यवस्थापनाचे विद्यार्थी आणि प्रत्यक्ष कृषी क्षेत्रातील अनुभवी व्यक्ती यांच्यामध्ये ज्ञान, अनुभव, नवकल्पना आणि व्यावसायिक दृष्टिकोनाची देवाणघेवाण घडवून आणणे हा होता. या कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार अ.ना. शिंदे यांची विशेष उपस्थिती लाभली होती. त्यांच्यासह महाविद्यालयातील प्रा. अभिषेक राठोड, आशिष मैन्दरकर, पितांबर पिरांगे, कैलास शिंदे, सादिक हरनमारे, निखिल सूर्यवंशी, विष्णू कांबळे, वाजीद शेख, शिवानंद चिकाळे, संतोष कोकरे आणि केशव बिडवे यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis