औंढा नागनाथ मंदिरावरील शिल्पकला नैसर्गिक रंगसंगतीत साकारावी - मुख्यमंत्री
मुंबई, 27 ऑगस्ट (हिं.स.)। औंढा नागनाथ हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्‌वाचे क्षेत्र आहे. या मंदिरावरील पुरातन शिल्पकलेचे जतन करत नैसर्गिक रंगांचा वापर करुन त्याचे संवर्धन करण्यात यावे. तलाव आणि मंदिर परिसरात वापरले जाणारे दगड आणि इतर साहित्य त
मुंबई


मुंबई, 27 ऑगस्ट (हिं.स.)। औंढा नागनाथ हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्‌वाचे क्षेत्र आहे. या मंदिरावरील पुरातन शिल्पकलेचे जतन करत नैसर्गिक रंगांचा वापर करुन त्याचे संवर्धन करण्यात यावे. तलाव आणि मंदिर परिसरात वापरले जाणारे दगड आणि इतर साहित्य त्याचप्रमाणे एकूणच सर्व कामे दर्जेदार असावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत श्री क्षेत्र औंढा नागनाथ तसेच नागपूर येथील कल्याणेश्वर मंदिराच्या सुधारित तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मान्यता देण्यात आली. तसेच पुण्याजवळ आंबेगाव येथील शिवसृष्टी थीम पार्कच्या चौथ्या टप्प्याच्या कामासाठी ५० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार संतोष बांगर, प्रवीण दटके, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत औंढा नागनाथ मंदिराच्या १९३ कोटी ५५ लाख २० हजार ४७४ कोटींच्या तर, कल्याणेश्वर मंदिराच्या ७२.४९ कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता देण्यात आली. आंबेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित शिवसृष्टी ऐतिहासिक थीम पार्क प्रकल्पाच्या प्रगतीचा यावेळी आढावा घेण्यात आला. यातील चौथ्या टप्प्यासाठीच्या कामासाठी ५० कोटींच्या निधीलाही मंजूरी देण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औंढा नागनाथ मंदिर परिसराचा विकास करताना मंदिराचे वैभव जपण्याचे निर्देश दिले. तर मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी जतन आणि संवर्धनाबरोबरच भाविकांसाठी चांगल्या सोयी-सुविधा निर्माण करण्याची सूचना केली.

औढा नागनाथ मंदिर परिसराचा विकास आराखडा

औंढा नागनाथ मंदिराच्या संवर्धन आणि जीर्णोद्धाराचे काम पुरातत्व आणि सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केले जाणार असून यामध्ये मंदिराच्या आवारातील नंदी मंडप, ओवरी आणि दर्शन बारी या मंदिराच्या आवारातील वास्तूंचे संवर्धन केले जाणार आहे. यासह हरीहर तलाव आणि परिसरातील मंदिरांचे संवर्धन आणि जीर्णोद्धार केला जाणार आहे. मंदिर परिसरासाठी बाह्य विद्युतीकरण, सीसीटीव्ही, रोषणाई आणि उद्यान विकास देखील केला जाणार आहे. भक्त निवासाची नव्याने उभारणी केली जाणार असून २५०० क्षमतेचा प्रतीक्षा कक्ष असणार आहे. भाविकांना कमी वेळेत दर्शन मिळावे, यादृष्टीने याचे नियोजन केले जाणार असून दर्शन रांगेत भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील. याचबरोबर मंदिराचे वैभव कायम राखून मोठी झाडे लावणे, परिसराला दगडी बांधकामासारखा साज देणे, परिसरात सापडलेल्या जुन्या मूर्त्या भाविकांना पाहता याव्यात यासाठी म्युझियम तयार करणे, भाविकांना माहिती देण्यासाठी माहिती केंद्र उभारणे आदी कामे केली जाणार असल्याची माहिती हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहूल गुप्ता यांनी सादरीकरणाद्वारे दिली.

कल्याणेश्वर मंदिर परिसरात पार्किंगची व्यवस्था वाढवावी

नागपूर येथील ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या कल्याणेश्वर मंदिर महाल परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्याचा आढावा घेताना आवश्यकता विचारात घेऊन पार्किंगची व्यवस्था वाढविण्यात यावी, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. तथापि, अशा परिसरात यांत्रिक पार्किंगचा वापर व्यवहार्य ठरत नसल्याने साध्या पार्किंगची व्यवस्था असावी, असे ते म्हणाले.

नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी यावेळी यापूर्वी शिखर समितीच्या बैठकीत देण्यात आलेल्या सूचनांनुसार मंदिर विकास आराखड्यात करण्यात आलेल्या बदलांची माहिती दिली. त्यानुसार बेसमेंटमधील यांत्रिक वाहनतळ वगळून त्याठिकाणी दोन तळघरांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच निवासी व्यवस्था वगळण्यात आली असून मंदिराच्या शिखराचे बांधकाम प्रस्तावात समाविष्ट करण्यात आले आहे. या सुधारणांनंतर प्रकल्पाचा एकूण अंदाजित खर्च ७२.४९ कोटी रुपये इतका निश्चित करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या खर्चास शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

कल्याणेश्वर मंदिर हे नागपूरमधील ऐतिहासिक आणि धार्मिक श्रद्धास्थान असून प्रस्तावित विकास आराखड्यात मंदिर परिसराचे हेमाडपंथी स्थापत्यशैलीनुसार सुशोभीकरण, भव्य सभामंडप, बहुउद्देशीयसभागृह, महाप्रसादासाठी स्वतंत्र सुविधा, प्रशासकीय कार्यालये, वेदशाळा, योगशाळा, प्रसाधनगृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, भाविकांसाठी विविध सुविधा तसेच दोन स्तरांवरील तळघरांचा समावेश करण्यात आला आहे.

या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्य, पराक्रम आणि स्वराज्य स्थापनेचा प्रेरणादायी इतिहास आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुणे येथील आंबेगाव बुद्रुक परिसरात विकसित करण्यात येत असलेल्या ‘शिवसृष्टी’ ऐतिहासिक थीम पार्क प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला. यावेळी शिवसृष्टी प्रकल्पाचे अध्यक्ष जगदीश कदम यांनी विविध टप्प्यांतील कामांची सविस्तर माहिती सादर केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित हा प्रकल्प देशातील तसेच आशियातील वैशिष्ट्यपूर्ण ऐतिहासिक थीम पार्क म्हणून विकसित करण्यात येत असून, नव्या पिढीपर्यंत शिवचरित्र प्रेरणादायी आणि प्रभावी पद्धतीने पोहोचविण्याचा त्यामागील उद्देश असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande