पत्र्याच्या शेडमध्ये सुरू होता ‘तिरट’ जुगार; पोलिसांचा छापा, 37.34 लाखांचा मुद्देमाल जप्त
बीड, 28 ऑगस्ट (हिं.स.) : शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये गुपचूप सुरू असलेल्या ‘तिरट’ जुगाराच्या अड्ड्यावर परळी ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत जुगार खेळणाऱ्या 18 जणांसह जुगार चालविणारा आणि जुगारासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या
पोलीस कारवाई


बीड, 28 ऑगस्ट (हिं.स.) : शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये गुपचूप सुरू असलेल्या ‘तिरट’ जुगाराच्या अड्ड्यावर परळी ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत जुगार खेळणाऱ्या 18 जणांसह जुगार चालविणारा आणि जुगारासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या अशा एकूण 20 जणांवर कारवाई करण्यात आली. पोलिसांनी रोख रक्कम, विविध कंपन्यांचे मोबाईल फोन, दुचाकी आणि चारचाकी वाहने असा एकूण 37 लाख 34 हजार 270 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

परळी-अंबाजोगाई रस्त्यालगत कन्हेरवाडी शिवारातील एका शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये ‘तिरट’ जुगार सुरू असल्याची माहिती परळी ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार 27 ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे 3.40 वाजता पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी काही जण पत्त्यांवर पैसे लावून जुगार खेळत असल्याचे, तर काही जणांकडून जुगार खेळविला जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

या प्रकरणात शेख निजाम फकिर अहमद, बालाजी नाथराव मुंडे, नागेश बाबुराव वाघमारे, गणेश व्यंकटी गर्जे, हनुमंत विष्णू मुंडे, बालाजी हनुमंत मुंडे, अनंत विठ्ठल कराड, शिवाजी केशव उघडे, सुरेश प्रल्हाद गजेवाड, पंजाबराव हरिश्चंद्र मोकाशे, तात्याराव रामराव काटेकर, प्रदीप बबन शहाणे, सिद्धेश्वर पांडुरंग मुसळे, राम महादेव गुट्टे, नागनाथ यादवराव यंमगर, अमोल हरीभाऊ मुंडे, नितीन निवृत्ती गर्जे आणि निवृत्ती सुग्रीव गर्जे यांच्यावर जुगार खेळल्याचा आरोप आहे.

तर शंकर पंढरीनाथ फड याच्यावर जुगार चालविल्याचा, तर प्रकाश माणिक फड याच्यावर जुगारासाठी जागा उपलब्ध करून दिल्याचा आरोप आहे.

पोलिसांनी केलेल्या कारवाईत रोख रकमेसह विवो, सॅमसंग, ओपो, आयफोन यांसह विविध कंपन्यांचे मोबाईल फोन जप्त केले. तसेच हिरो स्प्लेंडर, होंडा शाईन, हिरो पॅशन प्रो यांसारख्या दुचाकी आणि महिंद्रा स्कॉर्पिओ, टाटा पंच यांसारखी चारचाकी वाहनेही पोलिसांनी ताब्यात घेतली.

पोलिसांच्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या सर्व मुद्देमालाची एकत्रित किंमत 37 लाख 34 हजार 270 रुपये आहे.

या कारवाईचा पंचनामा परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मल्हार शिवरकर यांनी दोन पंचांसमक्ष केला. जप्त केलेला मुद्देमाल तपासकामी पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अंकुश ज्ञानेश्वर निमोणे यांच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. 406/2026, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 4 व 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्याची कारवाई पोलीस अंमलदार क्षीरसागर यांनी केली असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पागोटे करीत आहेत.

------------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande