
रायगड, 28 ऑगस्ट, (हिं.स.)। ताम्हणी घाट परिसरातील कोंडेथर गावाच्या हद्दीत पुणे-माणगाव मार्गालगत दरीत आढळलेल्या अनोळखी महिलेच्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. महिलेची ओळख पटवून तिच्या खुनाच्या आरोपावरून दोन संशयितांना अवघ्या २४ तासांत पिंपरी-चिंचवड परिसरातून ताब्यात घेण्यात आले. दुर्गाप्रसाद मंगलप्रसाद प्रतापजी (वय २४) आणि दिनेशकुमार बीसराम प्रजापती (वय २७), दोघेही सध्या चिखली, पुणे येथे राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
माणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत २५ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३५ वाजण्याच्या सुमारास ताम्हणी घाट परिसरातील मौजे कोंडेथर गावाच्या हद्दीत पुणे-माणगाव रस्त्यालगत दरीत २५ ते ३० वर्षांच्या अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती. मात्र, तपासादरम्यान महिलेचा गळा आवळून खून झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर २६ ऑगस्ट रोजी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २४५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) व २३८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या नेतृत्वाखाली तपास पथके तयार करण्यात आली. पोलिसांनी महिलेची ओळख पटविण्यासोबतच आरोपींचा शोध घेण्यासाठी तांत्रिक तपास सुरू केला.
तपासात मृत महिलेची ओळख सुमन गोपाळ यादव राणा, रा. चिखली, पुणे, मूळ रा. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश अशी पटली. त्यानंतर तांत्रिक तपास व मिळालेल्या माहितीच्या आधारे दुर्गाप्रसाद प्रतापजी आणि दिनेशकुमार प्रजापती यांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानुसार दोघांना पिंपरी-चिंचवड परिसरातून ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांच्या चौकशीत दोघांनी महिलेला फिरवण्याच्या बहाण्याने ताम्हणी घाट परिसरात नेले. तेथे ओढणीच्या साहाय्याने गळा आवळून तिची हत्या केल्यानंतर मृतदेह घाटातील दरीत फेकल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी माणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)