
३,४०० प्रपत्रे आढळली; एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा, पाच बीएलओंच्या निलंबनाची कारवाई प्रस्तावित
रायगड, 28 ऑगस्ट (हिं.स.) : पनवेल : मतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण २०२६ अंतर्गत अत्यंत गोपनीय असलेल्या निवडणूक आयोगाच्या गणना प्रपत्रांच्या (Enumeration Forms) अनधिकृतपणे झेरॉक्स प्रती काढण्याचा धक्कादायक प्रकार खारघरमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी खारघर पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी संबंधित पाच मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांवर (BLO) निलंबनाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.
खारघर सेक्टर १९ येथील एका झेरॉक्स सेंटरमध्ये २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी निवडणूक आयोगाच्या अधिकृत गणना प्रपत्रांच्या अनधिकृत प्रती काढल्या जात असल्याची तक्रार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर यांनी मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे केली. तक्रारीची गंभीर दखल घेत सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी चौकशी केली.
यावेळी मुर्बी गावातील सूरज पाटील हे संबंधित गणना प्रपत्रांच्या झेरॉक्स प्रती काढताना आढळून आले. तपासणीदरम्यान घटनास्थळी तब्बल ३,४०० गणना प्रपत्रे आढळून आली. ही कागदपत्रे ११ मतदान केंद्रांशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले. त्यापैकी पाच मतदान केंद्रांची शंभरहून अधिक प्रपत्रे, तर उर्वरित सहा केंद्रांची प्रत्येकी एक प्रपत्र असल्याचे तपासणीत समोर आले.
निवडणूक नियमांनुसार संवेदनशील गणना प्रपत्रे केवळ संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या (BLO) ताब्यात असणे अपेक्षित आहे. त्यामुळे ही कागदपत्रे अनधिकृतपणे बाहेर नेऊन त्यांची झेरॉक्स काढल्याप्रकरणी सूरज पाटील यांच्याविरुद्ध खारघर पोलीस ठाण्यात FIR क्रमांक ०४०९/२६ नुसार भारतीय लोकप्रतिनिधित्व अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, ज्या पाच बीएलओंच्या दप्तरातून मोठ्या प्रमाणात गणना प्रपत्रे बाहेर गेल्याचे निदर्शनास आले, त्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नियुक्ती प्राधिकारी तथा पनवेल महानगरपालिका आयुक्तांना संबंधित पाचही बीएलओंना तत्काळ निलंबित करून त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी पनवेल महापालिकेचे उपायुक्त तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी नानासाहेब कामठे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील पोलीस तपास सुरू असून, संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली.
-----------------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)