
छत्रपती संभाजीनगर, 28 ऑगस्ट (हिं.स.)। मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीस सरकारवर टीका केली. ते आंदोलनावर ठाम आहेत. उद्यापासून ते उपोषणाला बसणार आहेत. पत्रकार परिषद घेत जरांगेंनी आंदोलनाचा संपूर्ण प्लान सांगितला.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आहेत. ते उपोषणावर ठाम आहेत. उद्यापासून ते उपोषणाला सुरूवात करणार आहेत. आधी आंतरवाली सराटीमध्ये ते एल्गार करणार त्यानंतर चलो मुंबईचा नारा देणार आहेत. उपोषणाला बसण्यापूर्वी त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी फडणवीस सरकारवर सडकून टीका केली. त्याचसोबत त्यांनी त्यांच्या आंदोलनाचा संपूर्ण प्लान सांगितला.
मनोज जरांगे यांनी आंदोलनाबद्दल सांगितले की, 'आंदोलन आंतरवाली सराटीतच होईल. मागण्या मान्य झाल्या नाही तर मुंबईला जाणार आहोत. मी उपोषणावरती ठाम आहे मरेपर्यंत उठत नाही. मेल्यावर मला मराठा समाजाने मुंबईकडे घेऊन जायचं.' यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दोन टप्प्यात तयार राहायचं आहे असे सांगितले.
प्रमाणपत्र रद्द केल्यावरून मनोज जरांगे यांनी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, 'आमचं वाटोळं केलं सरकारने. सोनवणेच्या पोरीचं वाटोळं झालं आणि फडणवीस-शिंदेंनी तळतळाट घेतला. कोणत्याही पोरांनी आत्महत्या करू नये मी त्यांचा बाप बसलो आहे इथे. यांनी प्रमाणपत्र दिले नाही तर मी बघतो यांना. पण एकाही पोराने प्रमाणपत्र मिळत नाही म्हणून आत्महत्या करू नये. आताच संधी आहे घरात बसू नका. मराठ्यांनी आता जागं व्हावं.'
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis