
लातूर, 28 ऑगस्ट (हिं.स.)।
अहमदपूर तालुक्यात १ सप्टेंबरपासून विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई; पोलीस प्रशासनाचा कठोर पवित्रा
दिवसेंदिवस वाढणारे रस्ते अपघात आणि त्यामध्ये होणारी जीवितहानी रोखण्यासाठी लातूर जिल्हा पोलीस दलाकडून पावले उचलण्यात आली असून, आता लातूर जिल्ह्यात व अहमदपूर तालुक्यात हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदपूर तालुक्यात १ सप्टेंबरपासून विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अहमदपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांनी दिली आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून जिल्हा पोलीस दलाकडून जनजागृती व विविध उपाययोजना करूनही अपघातातील जीवितहानीचे प्रमाण अपेक्षेप्रमाणे कमी होत नसल्याचे दिसून आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. अपघाताच्या वेळी दुचाकीस्वाराच्या डोक्याला होणारी गंभीर दुखापत अनेकदा जीवघेणी ठरते. याउलट, हेल्मेटचा योग्य वापर केल्यामुळे अनेक जणांचे प्राण वाचल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे 'हेल्मेटला आता काहीही पर्याय नाही' असे मत प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर माहिती देताना उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले म्हणाले की,लातूर जिल्ह्यात चालू वर्षात आतापर्यंत रस्ते अपघातांमध्ये ४७२ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. हा केवळ अपघातांचा आकडा नसून शेकडो कुटुंबांच्या वेदनेची कहाणी आहे. या आकडेवारीमागे अनेक कुटुंबांचे आधारस्तंभ हिरावले गेले आहेत. दुचाकीस्वारांनी दंडाच्या भीतीपोटी नव्हे, तर आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी आणि प्रेमापोटी हेल्मेट वापरणे गरजेचे आहे. अहमदपूर तालुक्यात १ सप्टेंबरपासून सुरू होणारी ही मोहीम केवळ कागदोपत्री न राहता नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर अत्यंत कडक कारवाई केली जाईल.
अहमदपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की,हेल्मेट वापरणे म्हणजे केवळ पोलिसांच्या कारवाईपासून वाचणे नाही, तर ते आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचे सुरक्षा कवच आहे. वाहन चालवताना आपल्या मागे आपले आई-वडील, पत्नी, मुले आणि कुटुंबियांच्या अपेक्षा असतात. काही मिनिटांच्या प्रवासासाठी हेल्मेट न घालण्याचा निष्काळजीपणा संपूर्ण कुटुंबासाठी आयुष्यभराची वेदना ठरू शकतो. त्यामुळे १ सप्टेंबरची वाट न बघता आजपासूनच प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेट वापरण्याचा संकल्प करावा आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे.
लातूर जिल्हा पोलीस दल व अहमदपूर पोलीस स्टेशनच्या या मोहिमेला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis