
बीड, 28 ऑगस्ट, (हिं.स.)। परळी वैजनाथ नगर परिषदेच्या लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर आणि डॉ. भालचंद्र सार्वजनिक वाचनालय या शहरातील महत्त्वाच्या सांस्कृतिक व शैक्षणिक वास्तूंसाठी स्वतंत्र विद्युत व्यवस्थेची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. पंकजा मुंडे व आ. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेच्या माध्यमातून ६३ के.व्ही.ए. क्षमतेचा नवीन स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला आहे.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिरात विविध सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक आणि कला क्षेत्रातील कार्यक्रम, नाट्यप्रयोग तसेच व्याख्याने आयोजित केली जातात. तर डॉ. भालचंद्र सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून विद्यार्थी, स्पर्धा परीक्षार्थी, वाचक आणि नागरिकांना अभ्यास व वाचनासाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाते. या दोन्ही वास्तूंना कार्यक्रमांच्या वेळी तसेच दैनंदिन वापरासाठी सुरळीत आणि स्थिर वीजपुरवठा मिळणे आवश्यक होते. ही आवश्यकता लक्षात घेऊन स्वतंत्र ट्रान्सफॉर्मरची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे नटराज रंगमंदिरातील सांस्कृतिक कार्यक्रम तसेच वाचनालयातील दैनंदिन कामकाज आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या सुविधांना याचा लाभ होणार आहे.
दरम्यान, शहराचा विकास केवळ रस्ते, पाणीपुरवठा आणि इतर भौतिक सुविधांपुरता मर्यादित न ठेवता सांस्कृतिक, शैक्षणिक आणि बौद्धिक पायाभूत सुविधा सक्षम करण्यावरही भर दिला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून नटराज रंगमंदिर आणि डॉ. भालचंद्र सार्वजनिक वाचनालयासाठी स्वतंत्र वीज व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांच्या गरजेनुसार आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम नगर परिषदेच्या माध्यमातून सुरू असल्याचे नगराध्यक्षा पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis