आशा सेविकांना सन्मान, सुरक्षितता अन् न्यायासाठी थोरवेंची ग्वाही
रायगड, 28 ऑगस्ट (हिं.स.)। गावागावातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी अत्यंत जबाबदारीने आणि निष्ठेने घेणाऱ्या आशा सेविका भगिनींच्या पाठीशी आपण भाऊ म्हणून सदैव ठामपणे उभे राहू. त्यांच्या आयुष्यातील निराशा दूर करून त्यांना सन्मान, सुरक्षितता आणि न्याय
Thorve assures ASHA workers of respect, safety, and justice.


रायगड, 28 ऑगस्ट (हिं.स.)। गावागावातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी अत्यंत जबाबदारीने आणि निष्ठेने घेणाऱ्या आशा सेविका भगिनींच्या पाठीशी आपण भाऊ म्हणून सदैव ठामपणे उभे राहू. त्यांच्या आयुष्यातील निराशा दूर करून त्यांना सन्मान, सुरक्षितता आणि न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही आमदार महेंद्र थोरवे यांनी दिली.

नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने कर्जत तालुक्यातील आशा सेविकांसोबत आमदार थोरवे यांनी रक्षाबंधन साजरे केले. यावेळी आशा सेविकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. कोरोना महामारीच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आशा सेविकांनी नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत अत्यंत महत्त्वपूर्ण सेवा बजावली. त्यांची ही सेवा कर्जत मतदारसंघातील नागरिक कधीही विसरणार नाहीत, अशा शब्दांत आमदार थोरवे यांनी आशा सेविकांच्या कार्याचा गौरव केला.

आशा सेविकांच्या प्रश्नांकडे शासनाचे दुर्लक्ष होऊ नये यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी सांगितले. आशा सेविकांना कायमस्वरूपी सेवेत रुजू करून घेण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय व्हावा, यासाठी आरोग्य विभागातील मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन ठोस प्रयत्न करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

“माझ्या आशा सेविका भगिनींच्या आयुष्यातील निराशा दूर करून त्यांना सन्मान, सुरक्षितता आणि न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. एक भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी सदैव ठामपणे उभा आहे,” असा विश्वास आमदार महेंद्र थोरवे यांनी यावेळी व्यक्त केला.

या कार्यक्रमाला कर्जत तालुक्यातील बहुसंख्य आशा सेविका उपस्थित होत्या. रक्षाबंधनाच्या निमित्ताने झालेल्या या उपक्रमातून आशा सेविकांच्या प्रश्नांना लोकप्रतिनिधींकडून पाठबळ मिळाल्याचे चित्र दिसून आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande