ममता बॅनर्जी आणि तृणमूल विद्यार्थी परिषद आयोजकांविरोधात गुन्हा दाखल
कोलकाता, 29 ऑगस्ट (हिं.स.) : पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी तसेच त्यांच्या पक्षाच्या विद्यार्थी संघटनेच्या आयोजकांविरोधात हेस्टिंग्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तृणमूल विद्यार्थी परिषदेच
ममता बॅनर्जी


कोलकाता, 29 ऑगस्ट (हिं.स.) : पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी तसेच त्यांच्या पक्षाच्या विद्यार्थी संघटनेच्या आयोजकांविरोधात हेस्टिंग्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तृणमूल विद्यार्थी परिषदेच्या स्थापना दिनानिमित्त 28 ऑगस्ट रोजी आयोजित कार्यक्रमादरम्यान कलकत्ता उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या समर्थकांनी कथितरित्या बॅरिकेड्स हटवले आणि पोलिस कर्मचाऱ्यांशी धक्काबुक्की केली. याशिवाय कॅथेड्रल रोडवरील वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. न्यायालयाने निश्चित केलेली वेळ संपल्यानंतरही कार्यक्रम सुरू ठेवण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 61(2), 223, 125(अ), 132 आणि 285 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ममता बॅनर्जींचे कार्यकर्त्यांना आवाहन

दरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या स्थापना दिन कार्यक्रमात ममता बॅनर्जी यांनी आपल्या समर्थकांना राजकीय दबावापुढे न झुकण्याचे आणि भाजपमध्ये प्रवेश न करण्याचे आवाहन केले.तृणमूल काँग्रेस लवकरच पुन्हा सत्तेत येईल आणि राज्यात नवा राजकीय इतिहास घडवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी खंबीर आणि निर्भय रहावे. गरज भासल्यास कारावास भोगावा परंतु, राजकीय आत्मसमर्पण करू नये असे आवाहन ममतांनी केले. तृणमूल काँग्रेसच तरुणांसाठी एकमेव आधार असल्याचे सांगत त्यांनी पक्षाच्या युवा समर्थकांना संघर्ष पुढे नेण्याचे आवाहन केले. या लढ्यात युवक आणि महिलांनी सक्रिय भूमिका बजावावी, असेही त्यांनी म्हंटले.विद्यार्थी राजकारणातून पुढे येत सत्तेपर्यंत पोहोचलेल्या आपल्यासारख्या नेत्यांना घाबरवता येणार नाही, असेही ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले.

----------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande