
नवी दिल्ली, 29 ऑगस्ट (हिं.स.) देशातील हॉकीचे जादूगर म्हणून ओळखले जाणारे विख्यात हॉकी खेळाडू, मेजर ध्यानचंद यांच्या 121 व्या जयंतीनिमित्त, देशभरात आज राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा होत आहे. भारतीय खेळाच्या इतिहासात, मेजर ध्यानचंद यांचे योगदान आजही अनेक क्रीडापटूंना प्रेरणा देणारे आहे.
नवी दिल्लीत इंडिया गेटजवळ असलेल्या मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियम वर आज यानिमित, केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री डॉ. मनसुख मांडवीय आणि केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या उपस्थितीत, एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यंदाच्या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण, ‘ एक घंटा खेल के मैदान मे’ हा उपक्रम होते. या उपक्रमाअंतर्गत, नागरिक, विशेषतः युवा खेळाडूंना, आपल्या दैनंदिन आयुष्यातला किमान एक तास तरी खेळ आणि शारीरिक उपक्रम, व्यायाम यासाठी देण्याकरिता प्रोत्साहन देण्यात येत आहे.
यावेळी मांडवीय यांनी, मेजर ध्यानचंद यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सकाळी 8 वाजल्यापासून सुरु झालेल्या या कार्यक्रमात शेकडो लोक विविध क्रीडा आणि संबंधित कार्यक्रमात सहभागी झाले.
देशभर राबवल्या जात असलेल्या ‘एक घंटा खेल के मैदान में’ या उपक्रमाचा उद्देश ‘फिट इंडिया’ चळवळ अधिक बळकट करणे आणि नागरिकांना आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग म्हणून खेळांचा समावेश करण्यास प्रोत्साहित करणे हा आहे, असे मांडवीय यावेळी म्हणाले.
“राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजऱ्या होणाऱ्या मेजर ध्यानचंद यांच्या 121 व्या जयंतीनिमित्त ‘फिट इंडिया’ चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी देशभरात ‘एक घंटा खेल के मैदान में’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.”, असेही ते पुढे म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे