अमरावती : शासकीय सुटीच्या दिवशी ग्रामपंचायत कार्यालयात दारू पार्टी? ग्रामस्थांचा संताप
ग्रामसचिव पोलिसांच्या ताब्यात अमरावती, 30 ऑगस्ट (हिं.स.) | तालुक्यातील वरूड पोलिस स्टेशन हद्दीतील ग्राम अमडापूर येथील ग्रामस्थांनी रात्री ८ वाजताच्या सुमारास ग्रामसचिवाविरूद्ध आक्रमक भूमिका घेतल्याने ग्रामपंचायत सदस्याने ११२ वर कॉल करून पोलिसांना
ओल्या पार्टीसाठी ग्रामसचिवाने उघडले रात्री कार्यालय


ग्रामसचिव पोलिसांच्या ताब्यात

अमरावती, 30 ऑगस्ट (हिं.स.) | तालुक्यातील वरूड पोलिस स्टेशन हद्दीतील ग्राम अमडापूर येथील ग्रामस्थांनी रात्री ८ वाजताच्या सुमारास ग्रामसचिवाविरूद्ध आक्रमक भूमिका घेतल्याने ग्रामपंचायत सदस्याने ११२ वर कॉल करून पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी ग्रामसचिवाला ताब्यात घेऊन प्रकरण शांत केले.

प्राप्त माहितीनुसार, शुक्रवारला रक्षाबंधनाची शासकीय सुटी असताना सुद्धा तेथील ग्रामसचिव मनोज तायवाडे याने रात्री ८ वाजता कार्यालय उघडून दारूची पार्टी केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. त्यामुळे वादग्रस्त सचिवाच्या मनमानी कारभार व गैरकारभाराविरुद्ध प्रचंड उद्रेक उसळला. कार्यालयीन वेळेत मद्यपान करणे, महिलांना अपमानास्पद वागणूक देणे, बोगस ग्रामसभा घेणे आणि शासकीय सुटीच्या दिवशी बेकायदेशीरपणे कार्यालय उघडणे अशा गंभीर प्रकारांमुळे ग्रामसचिव आधीच ग्रामस्थांच्या रडावर होते. परंतु शासकीय सुटीच्या दिवशी रात्री ८ वाजता सचिवाने गुपचूप गावात येऊन ग्रामपंचायत कार्यालय उघडले. रात्रीच्या अंधारात शासकीय रेकॉर्ड्स आणि महत्त्वाचे दस्तऐवज गायब करण्याचा किंवा त्यात बोगस नोंदी करण्याचा हा प्रयत्न होता का, असा संशय गावकऱ्यांना आल्याने गावातील तरुण मोठ्या संख्येने ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर जमा झाले. सचिवाचा उद्दमपणा आणि कार्यालयाबाहेर तरुणांची वाढती गर्दी पाहून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी ग्रामपंचायत सदस्य प्रदीप सोनार यांनी तातडीने ११२ वर फोन करून पोलिसांना पाचारण केले.

गावकऱ्यांचा रोष पाहता पोलिसांनी तत्काळ सचिवाला ताब्यात घेतले व शासकीय रुग्णालयात नेऊन रक्ताचे नमुने घेतले. शासकीय नियमांची पायमल्ली करणाऱ्या, मद्यधुंद अवस्थेत फिरणाऱ्या आणि महिलांशी असभ्य वर्तन करणाऱ्या या वादग्रस्त सचिवाचे तात्काळ निलंबन करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी व ग्रामपंचायत सदस्यांनी गटविकास अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे. वैद्यकीय अहवाल आल्यानंतर सचिवावर बडतर्फीची कारवाई होणार का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

-------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande