वर्धा ठरले महाराष्ट्रातील पहिले ‘पुस्तकांचे शहर’; सुरगावला मिळणार ‘कवितांचे गाव’ची ओळख
वर्धा, 30 ऑगस्ट, (हिं.स.)महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रासाठी अभिमानास्पद निर्णय घेण्यात आला असून, राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या कर्मभूमी असलेल्या वर्धा शहराला आता महाराष्ट्रातील पहिले ‘पुस्तकांचे शहर’ म्
वर्धा महाराष्ट्रातील पहिले ‘पुस्तकांचे शहर’; सुरगावला मिळणार ‘कवितांचे गाव’ची ओळख


वर्धा, 30 ऑगस्ट, (हिं.स.)महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रासाठी अभिमानास्पद निर्णय घेण्यात आला असून, राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या कर्मभूमी असलेल्या वर्धा शहराला आता महाराष्ट्रातील पहिले ‘पुस्तकांचे शहर’ म्हणून विकसित करण्यात येणार आहे. तसेच वर्ध्यातील सुरगाव हे ‘कवितांचे गाव’ म्हणून ओळखले जाणार आहे. उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत ही महत्त्वपूर्ण घोषणा केली.पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या विशेष मागणीची दखल घेत मराठी भाषा विभागाने हा निर्णय घेतला आहे. या उपक्रमांतर्गत येत्या दोन महिन्यांत तब्बल ३५ हजार पुस्तके वर्ध्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार असून, ती पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्याकडे सुपूर्द केली जाणार आहेत.

याशिवाय, पुढील एका महिन्यात वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र मराठी भाषा विभाग सुरू करण्यात येणार आहे. या विभागासाठी स्वतंत्र मराठी भाषा अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल. त्यामुळे मराठी भाषेशी संबंधित प्रशासकीय कामकाजाला गती मिळण्यास मदत होणार आहे.

दरम्यान, वर्ध्याच्या औद्योगिक विकासालाही चालना देण्याचा निर्णय उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केला. जुनी औद्योगिक परंपरा जपत आवश्यकतेनुसार नवीन जमीन अधिग्रहण करण्यात येईल, तसेच वापरात नसलेल्या औद्योगिक जमिनींबाबतही धोरणात्मक निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

रत्नागिरी आणि वर्धा यांच्यातील भावनिक नाते अधिक दृढ करण्यासोबतच आचार्य विनोबा भावे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी सुरगावचा ‘कवितांचे गाव’ म्हणून विकास करण्यात येणार आहे.

उदय सामंत यांनी सांगितले की, आतापर्यंत महाराष्ट्रात ‘पुस्तकांचे गाव’ आणि ‘कवितांचे गाव’ अशा संकल्पना राबविण्यात आल्या आहेत. मात्र आता वर्धा शहराला महाराष्ट्रातील पहिले ‘पुस्तकांचे शहर’ म्हणून घोषित करण्यात येत आहे.

वर्ध्याच्या या नव्या साहित्यिक आणि सांस्कृतिक ओळखीमुळे वाचन संस्कृतीला नवी ऊर्जा मिळण्याबरोबरच सांस्कृतिक पर्यटनालाही मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

-----------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande