
पुणे, 30 ऑगस्ट (हिं.स.)। विविध मागण्यांसाठी दोन आठवड्यांहून अधिक काळ आंदोलन करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या लढ्याला अखेर यश आले. आंदोलक विद्यार्थ्यांसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. त्यानंतर आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांनी शनिवारी रात्री मांजरी येथे उपोषण करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. या भेटीनंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित केले. आदिवासी विद्यार्थ्यांचे पुणे, नागपूर आणि नाशिक येथे बेमुदत उपोषण सुरू होते. आदिवासी वसतिगृहात प्रवेशासाठी वयाची अट लागू करणारा १४ ऑगस्टचा शासन आदेश रद्द करणे, ही विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी होती. सरकारने हा आदेश यापूर्वीच रद्द केला होता. मात्र, इतर सर्व मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली होती. अखेर राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेत शनिवारी रात्री दोन शासन निर्णय जारी केले. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या भोजनासाठी सुरू असलेली डीबीटी योजना बंद करून वसतिगृहातच भोजन तयार करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध कारणांनी झालेल्या मृत्यूंची चौकशी करण्यासाठी माजी महासंचालक (आरोग्यसेवा) डॉ. सुभाष साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती विद्यार्थ्यांच्या मृत्यूंच्या कारणांचा आढावा घेऊन शासनाला उपाययोजनांसह कृती आराखडा सादर करणार आहे. समितीला तीन महिन्यांच्या कालावधीत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु