राज्य एसआयआर प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध; दोन कोटींहून अधिक जणांची नावं वगळली
- नावं वगळण्यात विविध कारणांचा समावेश मुंबई, 31 ऑगस्ट (हिं.स.) - राज्यात विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) 2026 अंतर्गत प्रारुप मतदार यादी आज, 31 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रक्रियेत तब्बल 2 कोटी 6 लाखांहून अधिक मतदारांचे Enumeration Forms
मतदार यादी


- नावं वगळण्यात विविध कारणांचा समावेश

मुंबई, 31 ऑगस्ट (हिं.स.) - राज्यात विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) 2026 अंतर्गत प्रारुप मतदार यादी आज, 31 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रक्रियेत तब्बल 2 कोटी 6 लाखांहून अधिक मतदारांचे Enumeration Forms उपलब्ध झाले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या मतदारांची नावे सध्याच्या प्रारुप यादीत दिसत नाहीत. मात्र, याचा अर्थ संबंधित मतदारांची नावे कायमची मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत, असा होत नाही. एसआयआर प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्रात 9 कोटी 78 लाख 54 हजार 49 नोंदणीकृत मतदार होते. प्रारुप मतदार यादीत 7 कोटी 71 लाख 65 हजार 562 मतदारांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे 2 कोटी 6 लाख 88 हजार 487 मतदारांची नावे प्रारुप यादीत समाविष्ट झालेली नाहीत. यामध्ये मतदार अनुपस्थित असणे, कायमस्वरूपी स्थलांतर, मृत्यू, दुबार नोंदणी किंवा Enumeration Form उपलब्ध न होणे अशा विविध कारणांचा समावेश आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानं महाराष्ट्रात मतदार यादीचं विशेष सखोल पुनरीक्षण-२०२६ सुरु आहे. या प्रक्रियेतील नव्या वेळापत्रकानुसार महाराष्ट्र शासनाच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने आज राज्यातील मतदारांची विशेष सखोल पुनरीक्षण-२०२६ प्रारुप मतदार यादी जाहीर केली आहे. या यादीतून 2 कोटी 6 लाख 88 हजार 487 नावं वगळण्यात आली आहेत. अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबर 2026 रोजी जाहीर केली जाणार आहे.

एसआयआर प्रक्रियेनंतर प्रारुप यादीतील मतदारांची संख्या 7 कोटी 71 लाख 65 हजार 562 मतदारांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 3 कोटी 95 लाख 89 हजार 905 इतकी आहे. तर, स्त्री मतदारांची संख्या 3 कोटी 75 लाख 72 हजार 570 इतकी आहे. राज्यातील तृतीयपंथी मतदारांची संख्या 3087 इतकी आहे.

प्रारुप मतदार यादीत नाव कसं शोधायचं?

प्रथम तुम्ही मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या वेबसाईटला किंवा भारत निवडणूक आयोगाच्या वेबसाईटला भेट द्या. सीईओ महाराष्ट्र वेबसाईटला भेट दिल्यानंतर तिथं प्रारुप मतदार यादी SIR 2026 हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करुन पुढं जावे. त्यानंतर निवडणूक आयोगाचं नवं पेज ओपन होईल.

राज्य महाराष्ट्र, वर्ष 2026, एसआयआर ड्राफ्ट रोल 2026 निवडा, यानंतर जिल्हा, विधानसभा मतदारसंघ, त्यानंतर भाषा निवडा, कॅप्चा नोंदवा. विधानसभा मतदारसंघातील यादी भाग निवडा. तो सिलेक्ट करुन, डाऊनलोड सिलेक्टेट पीडीएफस पर्यायावर क्लिक करा. मतदार यादी डाऊनलोड झाल्यानंतर पीडीएफमध्ये तुमचं नाव चेक करा.

वगळलेली नावं कुठं पाहायची?

सीईओ महाराष्ट्रच्या वेबसाईटवरील ASSD LIST (absent shifted dead duplicate) SIR 2026 पर्यायावर क्लिक करा. इथं तुम्ही वैयक्तिक मतदार ओळखपत्र क्रमांक नोंदवून तुमचं नाव वगळलंय की नाही ते पाहू शकता. मतदान केंद्र निहाय वगळलेल्या मतदारांची यादी डाऊनलोड करुन त्यामध्ये तुमचं नाव आहे की नाही हे पाहू शकता.

महत्त्वाच्या तारखा आणि वेळापत्रक

दावे व हरकतींचा कालावधी : 31 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2026

अंतिम मतदार यादी प्रसिद्धी : 4 नोव्हेंबर 2026

वय अर्हता दिनांक : 1 ऑक्टोबर 2026 (किंवा त्यापूर्वी 18 वर्षे पूर्ण होणारे नवमतदार).

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande