
शोपियान, 31 ऑगस्ट (हिं.स.) । जम्मू आणि काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात एका संयुक्त कारवाईदरम्यान सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा एक अड्डा उद्ध्वस्त केला. या शोधमोहिमेदरम्यान, सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विशिष्ट माहितीच्या आधारे, जम्मू आणि काश्मीर पोलीस, ४४ राष्ट्रीय रायफल्स आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाने शोपियानच्या नाईकपोरा मेमेंदर परिसरात संयुक्त कारवाई सुरू केली. बाग परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली.शोधमोहिमेदरम्यान, सुरक्षा दलांना एक संशयास्पद अड्डा सापडला, जिथून एक एके-४७ रायफल, दोन एके-४७ मॅगझिन, ७.६२ मिमीच्या ६० गोळ्या, एक पिस्तूल, एक ग्रेनेड आणि ९ मिमीच्या सहा गोळ्या जप्त करण्यात आल्या.अधिकाऱ्यांनी सांगितले की, जप्त केलेली शस्त्रे ताब्यात घेण्यात आली असून तपास सुरू करण्यात आला आहे. ही शस्त्रे कुठून मिळवण्यात आली आणि त्यांचा वापर कशासाठी केला जाणार होता, हे निश्चित करण्याचे काम तपास यंत्रणा करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे