इराण-अमेरिका युद्धानंतर पंतप्रधान मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी पहिली भेट
नवी दिल्ली , 31 ऑगस्ट (हिं.स.)।पंतप्रधान नरेंद्र मोदी एससीओ शिखर परिषदेसाठी किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे असताना त्यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांची भेट घेतली आहे. फेब्रुवारीमध्ये इराण आणि अमेरिकेदरम्यान युद्ध सुरू झाल्यानंतर
इराण-अमेरिका युद्धानंतर पंतप्रधान मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी पहिली भेट


नवी दिल्ली , 31 ऑगस्ट (हिं.स.)।पंतप्रधान नरेंद्र मोदी एससीओ शिखर परिषदेसाठी किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे असताना त्यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांची भेट घेतली आहे. फेब्रुवारीमध्ये इराण आणि अमेरिकेदरम्यान युद्ध सुरू झाल्यानंतर दोन्ही नेत्यांची ही पहिलीच भेट आहे. मात्र, या दोन्ही नेत्यांमध्ये नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दोन्ही देशांकडून या भेटीबाबत अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही.

फेब्रुवारीपासूनच पंतप्रधान मोदी इराणच्या नेतृत्वाच्या संपर्कात आहेत. सर्व वाद आणि मतभेद संवाद व राजनैतिक मार्गाने सोडवले जावेत, यावर त्यांनी सातत्याने भर दिला आहे. मध्य पूर्वेतील स्थैर्य कायम ठेवण्याची तसेच जागतिक पुरवठा साखळ्या विस्कळीत होऊ नयेत, याची गरजही पंतप्रधानांनी अधोरेखित केली आहे.

30 जून रोजी इराणचे राष्ट्राध्यक्ष पेजेश्कियान यांच्याशी फोनवर झालेल्या संभाषणादरम्यानही पंतप्रधान मोदींनी या क्षेत्रातील वाढत्या तणावाबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्यांनी शांतता आणि स्थैर्याप्रती भारताची बांधिलकी पुन्हा एकदा स्पष्ट केली होती. यावेळी इराणमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेची खात्री केल्याबद्दल पंतप्रधानांनी पेजेश्कियान यांचे आभारही मानले होते.

पंतप्रधान मोदी आणि पेजेश्कियान यांची भेट अशा वेळी झाली आहे, जेव्हा काही तासांपूर्वीच अमेरिका आणि इराणदरम्यान सुमारे महिनाभरानंतर पुन्हा एकदा लष्करी कारवाई झाली. अमेरिकेने लारक बेटावरील इराणच्या लष्करी रॉकेट प्रक्षेपकांना लक्ष्य केले. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणला बारूदी सुरुंग पेरण्यापासून रोखण्यासाठी ही कारवाई करणे आवश्यक होते, असा अमेरिकेचा दावा आहे.

याला प्रत्युत्तर म्हणून इराणने संयुक्त अरब अमिराती आणि जॉर्डनमधील अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य केले. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील अमेरिकेचे ड्रोन पाडल्याचा दावाही केला आहे.यानंतर इराणच्या नेतृत्वाने संघर्ष वाढवण्यासाठी अमेरिकेला जबाबदार धरले. राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांनी सांगितले की, इराणला युद्ध नको आहे; मात्र त्याच्यावर हल्ला झाल्यास तो हल्लेखोरांना निर्णायक प्रत्युत्तर देईल.

एससीओ शिखर परिषदेसाठी रवाना होण्यापूर्वीही पेजेश्कियान यांनी सांगितले होते की, इराण कोणत्याही प्रकारच्या आक्रमकतेला पूर्ण ताकद आणि ठामपणाने प्रत्युत्तर देईल. त्यांचे हे वक्तव्य अमेरिकेसाठी स्पष्ट इशारा मानले जात आहे. संघर्ष आणखी वाढवल्यास मध्य पूर्वेतील परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते, असा संदेश त्यांच्या वक्तव्यातून देण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande