अमरावती जिल्हा परिषदेला पहिल्या टप्यात मिळाले २४२ शिक्षक
अमरावती, 31 ऑगस्ट (हिं.स.) । पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात अमरावती जिल्हा परिषदेला २४२ शिक्षक मिळाले आहेत. यामध्ये १९४ मराठी माध्यमाचे, ३६ उर्दू माध्यमाचे आणि १२ माध्यमिक शिक्षकांचा समावेश आहे
जिल्हा परिषदेला पहिल्या टप्यात मिळाले २४२ शिक्षक


अमरावती, 31 ऑगस्ट (हिं.स.) । पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात अमरावती जिल्हा परिषदेला २४२ शिक्षक मिळाले आहेत. यामध्ये १९४ मराठी माध्यमाचे, ३६ उर्दू माध्यमाचे आणि १२ माध्यमिक शिक्षकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे मेळघाटातील शाळांसाठी यापैकी १८४ शिक्षकांची नियुक्ती झाली आहे. मात्र, अपेक्षित ४४० जागांच्या तुलनेत ही संख्या कमी असल्याने मेळघाटातील तब्बल २५६ पदे अद्याप रिक्त राहिली आहेत.

राज्यात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू असून नुकतीच निवड यादी जाहीर करण्यात आली. या भरतीमुळे शिक्षकांची रिक्त पदे भरण्याला काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी मेळघाटातील शिक्षकांची कमतरता अद्याप कायम आहे. दुर्गम आणि आदिवासी भागातील शाळांमध्ये आधीच शिक्षकांची टंचाई असताना अपेक्षेच्या तुलनेत कमी नियुक्त्या झाल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून गुणवत्तेच्या आधारे आणि संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरती केली जात असल्याचे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यात १३ हजारांहून अधिक शिक्षकांची नियुक्ती झाली असताना अमरावती जिल्हा परिषदेला २४२ शिक्षक मिळाले आहेत. जिल्ह्यात शिक्षकांची साडेपाचशेहून अधिक पदे रिक्त असल्याची माहिती असून, पहिल्या टप्प्यातील नियुक्त्यांनंतरही तीनशेहून अधिक पदे रिक्त राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्याला किती शिक्षक मिळतात आणि विशेषतः मेळघाटातील रिक्त पदांना किती प्राधान्य दिले जाते, याकडे शिक्षण विभागासह पालक व शिक्षकांचे लक्ष लागले आहे.

मेळघाटातील उर्वरित २५६ पदे भरल्यास दुर्गम भागातील शाळांमधील शिक्षकांची कमतरता मोठ्या प्रमाणात दूर होऊन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला अधिक बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त असल्याचेही भरती जिल्हा परिषदेत मराठी व उर्दू माध्यमातील शिक्षकांची प्रक्रियेशी संबंधित माहितीतून स्पष्ट झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande