
कोल्हापूर, 06 ऑगस्ट (हिं.स.)। बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांना बिहारच्या राज्यपाल भवनात श्रद्धांजली वाहण्यात आली. शिवाय बिहारचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल (रि.) सय्यद अता हसनैन यांनी सतेज पाटील यांना पत्र पाठवून पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
शोक संदेशात म्हंटले आहे की, बिहार, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अत्यंत दुःख झाले. त्यांचे निधन म्हणजे सार्वजनिक जीवन, शिक्षण क्षेत्र आणि राष्ट्र उभारणीला समर्पित असलेल्या एका प्रेरणादायी युगाचा अंत आहे. डॉ. डी. वाय. पाटील यांना एक दूरदृष्टी असलेले शिक्षणतज्ज्ञ, प्रतिष्ठित नेते आणि संवेदनशील प्रशासक म्हणून नेहमी आदराने आठवले जाईल. बिहारचे राज्यपाल म्हणून आपल्या कार्यकाळात त्यांनी राज्याला दूरदर्शी नेतृत्व दिले आणि उच्च शिक्षण, सुशासन तसेच प्रशासकीय संस्थांच्या सक्षमीकरणात मोठे योगदान दिले.
दरम्यान,बिहार लोक भवन, पटना येथे शोक सभा झाली. राज्यपाल लेफ्टनंट जनरल (रि.) सय्यद अता हसनैन यांच्या अध्यक्षतेखाली शोक सभा आयोजित करण्यात आली होती.
डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक आणि शिक्षण क्षेत्राची भरून न निघणारी हानी झाली आहे, या शब्दात श्रद्धांजली वाहण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar