
लंडन / मुंबई, 10 सप्टेंबर (हिं.स.) - पर्यावरणाचे भान ठेऊनच नवा महाराष्ट्र घडविण्याचे काम सुरु असून ‘ग्रीन कॅपिटल’ आणि तंत्रज्ञान घेऊन महाराष्ट्रात गुंतवणूक करा. महाराष्ट्राकडे असलेली मोठी बाजारपेठ, कुशल मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधांची ताकद यांची सांगड घालून आपण पर्यावरणपूरक विकासाची नवी भागीदारी उभारूया, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
वर्ल्ड लीडरशिप फोरमच्या वतीने लंडन येथे संसदेच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये आयोजित महाराष्ट्र–भारत–यूके डायलॉग या आंतरराष्ट्रीय परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आज ‘स्टेट्समनशिप अवॉर्ड’ देण्यात आले. महाराष्ट्राच्या विकासासाठी केलेले नेतृत्व, सार्वजनिक सेवेतील योगदान आणि राज्याच्या प्रगतीसाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन हा सन्मान देण्यात आला. याप्रसंगी उपमुख्यमंत्री बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपण महाराष्ट्राला नव्या उंचीवर नेण्यासाठी एक टीम म्हणून काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्राचा एफडीआयमधील वाटा आणखी वाढवण्याचे उद्दिष्ट असल्याचे नमूद करत त्यांनी ब्रिटिश उद्योगपती आणि गुंतवणूकदारांना महाराष्ट्रात गुंतवणुकीचे खुले निमंत्रण दिले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बॅरोनीस गीता नारगुंड ,लॉर्ड रेमिरेंजर, लॉर्ड रवेल, यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या परिषदेत ब्रिटनच्या संसदेतील खासदार, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील नेते, विविध उद्योग व व्यावसायिक संस्थांचे प्रतिनिधी, उद्योजक, गुंतवणूकदार, व्यावसायिक तसेच भारतीय आणि ब्रिटिश समुदायातील मान्यवर सहभागी झाले.
ब्रिटनमधील विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचीही या परिषदेला उपस्थिती होती. लेबर पार्टी, कन्झर्व्हेटिव्ह पार्टी आणि रिफॉर्म यूकेसह विविध पक्षांशी संबंधित नेते या संवादात सहभागी झाले. त्यामुळे महाराष्ट्र आणि ब्रिटनमधील संबंध अधिक व्यापक आणि सर्वसमावेशक पद्धतीने मजबूत करण्याची भूमिका या परिषदेत दिसून आली.
आपल्या भाषणाची सुरुवात मराठीत करीत एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र आणि ब्रिटनमधील संबंध हे केवळ सरकार आणि व्यापारापुरते मर्यादित नसल्याचे सांगितले. भारतीय वंशाचे नागरिक, विद्यार्थी, उद्योग क्षेत्र आणि लोकांमधील संबंधांमुळे दोन्ही देशांमध्ये एक मजबूत पूल निर्माण झाला आहे, असे ते म्हणाले.
मोदींमुळे भारताची आर्थिक ताकद वाढली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने जागतिक अर्थव्यवस्थेत आपले स्थान अधिक मजबूत केले आहे. मोदी यांनी देशासमोरील मोठ्या आर्थिक आव्हानांचे संधीमध्ये रूपांतर केले. त्यांच्या दूरदृष्टीच्या आणि गतिमान नेतृत्वामुळे भारत आज जागतिक स्तरावर एक महत्त्वाची शक्ती म्हणून पुढे येत आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सुमारे दशकापूर्वी भारताचा समावेश जगातील ‘फ्रॅजाइल फाइव्ह’ म्हणजेच कमकुवत अर्थव्यवस्थांच्या गटात केला जात होता. आज भारत जगातील पाच मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये आहे. पायाभूत सुविधांचा विकास, डिजिटल सार्वजनिक सेवा, कर सुधारणा आणि गरजू नागरिकांना थेट मदत यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळाली आहे असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले.
‘आत्मनिर्भर भारत’, ‘मेक इन इंडिया’, ‘स्किल इंडिया’, ‘स्टार्टअप इंडिया’ आणि ‘डिजिटल इंडिया’ या उपक्रमांच्या माध्यमातून भारताच्या विकासाला स्पष्ट दिशा देण्यात आली आहे.
ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्यावर मध्यपूर्वेतील देशांच्या भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी सोपवली. सध्या ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये ग्लोबल एमबीएचे शिक्षण घेत आहेत अशी माहितीही यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी दिली.
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था वेगाने
महाराष्ट्र हा देशाच्या विकासाचा प्रमुख इंजिन असल्याचे सांगताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी राज्याच्या अर्थव्यवस्थेची आकडेवारी मांडली. देशाच्या जीडीपी आणि निर्यातीत महाराष्ट्राचा मोठा वाटा असून महाराष्ट्राला दक्षिण आशियाची तंत्रज्ञानाची राजधानी बनवण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
ब्रिटन-महाराष्ट्र व्यापाराला नवी दिशा
भारत आणि ब्रिटनमधील मुक्त व्यापार करारामुळे दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणुकीला मोठी संधी निर्माण झाली असून लंडनमध्ये डिझाइन करा आणि महाराष्ट्रात उत्पादन करा, अशी नवी भागीदारी उभी करण्याचे आवाहन त्यांनी ब्रिटिश उद्योगविश्वाला केले.
महाराष्ट्रात मोठ्या पायाभूत सुविधा
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, वाढवण बंदर, अटल सेतू, दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांसारख्या प्रकल्पांमुळे महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती मिळते आहे. या प्रकल्पांमुळे वाहतूक आणि मालवाहतुकीचा खर्च कमी होण्यास मदत होईल. मुंबईसह राज्यातील विविध भागांना देश-विदेशातील बाजारपेठांशी अधिक वेगाने जोडण्याचे काम सुरू असल्याचे ते म्हणाले. नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग, कोकण एक्स्प्रेस वे आणि कोकण किनारी मार्गासारख्या प्रकल्पांमुळे राज्यातील विविध विकास केंद्रे एकमेकांशी जोडली जातील. यामुळे पर्यटन, उद्योग आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
धारावी, ठाणे पुनर्विकास
शहरी विकास म्हणजे केवळ रस्ते आणि इमारती उभारणे नव्हे, तर लोकांचे जीवनमान सुधारणे होय, असे स्पष्ट करून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्प, ठाणे क्लस्टर पुनर्विकास, मुंबईतील जुन्या चाळींचा पुनर्विकास ही उदाहरणे सांगितली.
विकासासोबत पर्यावरणाचे संरक्षण
मुंबईने दक्षिण आशियातील पहिले स्वतंत्र नेट-झिरो क्लायमेट अॅक्शन प्लॅन सुरू केले असल्याचे त्यांनी नमूद केले. २०३० पर्यंत राज्याच्या वीज गरजेपैकी ५० टक्के गरज स्वच्छ ऊर्जेतून पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईत दररोज मोठ्या प्रमाणात सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा औद्योगिक वापर केला जात आहे. सह्याद्री पर्वतरांगांमध्ये प्रस्तावित न्यू महाबळेश्वर प्रकल्पात मोठा भाग संरक्षित हिरव्या क्षेत्रासाठी ठेवण्यात येणार असून पर्यावरणपूरक पर्यटन आणि स्थानिक रोजगाराला चालना देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
‘एमओयू म्हणजे केवळ घोषणा नाही’
गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्रात निर्णय प्रक्रियेला वेग देण्यात येत असल्याचे सांगताना उपमुख्यमंत्र्यांनी राज्याच्या वॉर रूमचा उल्लेख केला. सुमारे ५० महत्त्वाच्या प्रकल्पांवर नियमित देखरेख केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. दावोस येथे झालेल्या सामंजस्य करारांपैकी जवळपास ७५ टक्के करार प्रत्यक्ष प्रकल्पांमध्ये रूपांतरित होत असल्याचे ते म्हणाले.
ब्रिटिश कंपन्यांसाठी मोठ्या संधी
इलेक्ट्रिक वाहन, बॅटरी तंत्रज्ञान, हरित हायड्रोजन, नवीकरणीय ऊर्जा, फिनटेक, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात ब्रिटिश कंपन्यांसाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी आहे. नवी मुंबई विमानतळ परिसरात एज्यु-सिटी, मेडि-सिटी, एरो-सिटी, स्पोर्ट्स सिटी आणि फिनटेक हब यांसारख्या प्रकल्पांना चालना दिली जात आहे. ब्रिटनमधील नामांकित विद्यापीठांनी महाराष्ट्रात शैक्षणिक केंद्रे सुरू करून संयुक्त अभ्यासक्रम आणि संशोधनाला चालना द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. ब्रिटिश कंपन्यांनी पुण्यात संशोधन आणि डिझाइन, मुंबईत वित्तीय व्यवस्था, छत्रपती संभाजीनगरमध्ये उत्पादन आणि वाढवण बंदरातून निर्यात अशा संपूर्ण मूल्य साखळीचा लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्राकडे स्केल, स्पीड आणि सस्टेनेबिलिटी आहे. ब्रिटनने आपले तंत्रज्ञान, डिझाइन आणि हरित भांडवल महाराष्ट्रात आणावे असेही ते म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी